Chhatrapati Sambhajinagar ZP .jpg Sarkarnama
मराठवाडा

ZP News: पदभार न घेणाऱ्या प्रशासकाला दीड तासात हजर करा, सीईओ मिन्नू पी. एम. यांचे आदेश ; इतरांनाही थेट निलंबनाचा इशारा

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कार्यकाळ संपलेल्या ६०५ ग्रामपंचायतींवर विविध विभागांतील विस्तार अधिकारी, शाखा अभियंते, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, नियुक्त्यांना महिना उलटूनही काही अधिकार्‍यांनी अजूनही पदभारच स्वीकारलेला नाही.

Jagdish Pansare

Gram Panchayat Administrator : ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी सोपवूनही प्रशासक पदभार स्वीकारण्यास नकार देत असतील, तर त्यांची गय केली जाणार नाही. 'चार्ज घेणार नसाल, तर थेट निलंबनाची कारवाई करू,' अशा कडक शब्दांत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले.

शिऊर येथील पदभार नाकारणाऱ्या अधिकाऱ्याला सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्या दालनात हजर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. सीईओंचा हा रुद्रावतार पाहून अनेकांचे धाबे दणाणले आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी (ता. ९) प्रशासकांच्या मनमानीचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. यावर सीईओंचा संताप अनावर झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कार्यकाळ संपलेल्या ६०५ ग्रामपंचायतींवर विविध विभागांतील विस्तार अधिकारी, शाखा अभियंते, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, नियुक्त्यांना महिना उलटूनही काही अधिकार्‍यांनी अजूनही पदभारच स्वीकारलेला नाही.

सदस्य संजय निकम यांनी हा प्रकार सभागृहाच्या निदर्शनास आणून देत तीव्र नाराजी व्यक्त केली. शिऊर परिसरातील एका अधिकाऱ्याने तर पदभार स्वीकारणार नसल्याचे लेखी पत्रच दिल्याचे त्यांनी सांगितले.

यावर सीईओ मिन्नू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकारी कृषी विभागाशी निगडित असल्याने जिल्हा कृषी अधिकार्‍यांना त्या अधिकाऱ्याला सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्या दालनात हजर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तो हजर न झाल्यास थेट निलंबनाचे आदेश काढण्याची तंबीही त्यांनी दिली. ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रत्येक प्रशासकाला पदभार स्वीकारावाच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आजी-माजी आमदारांच्या हस्तक्षेपाला विरोध

ग्रामपंचायतींवरील प्रशासक नियुक्त्यांचा मुद्दा बैठकीत राजकीय वळणावर गेला. वैजापूरमधील नियुक्त्यांवर वारंवार आक्षेप कोण घेत आहे? असा सवाल सदस्य संजय निकम यांनी उपस्थित केला. प्रशासक नियुक्ती हा जि.प.चा प्रशासकीय अधिकार असून, त्यात आजी-माजी आमदारांची लुडबूड खपवून घेतली जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मनमानी पत्रे

काही नेते कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी मनमानी पत्रे देत असल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी उपस्थित केला. अशा प्रत्येक पत्रावर प्रशासनाने कार्यवाही करणे आवश्यक नसल्याचे त्यांनी बजावले. त्यामुळे प्रशासक नियुक्त्यांमध्ये प्रशासकीय अधिकार आणि राजकीय हस्तक्षेपामुळे ओढाताण सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT