Chhatrapati Sambhajinagar ZP .jpg Sarkarnama
मराठवाडा

ZP Election: मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला मिळणार नवे ६ स्वीकृत सदस्य; राजकीय पक्षांकडे 'लाॅबिंग' सुरू

Chhatrapati Sambhajinagar ZP News: विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपसह शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या प्रमुख पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : शासनाच्या नव्या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत ६ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. अधिसूचना जारी होताच या नियुक्त्यांसाठी जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत निवडून आलेले एकूण ६३ सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपचे २३, शिवसेनेचे २१, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ९, राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाचे ४, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष , प्रहार आणि काँग्रेस पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. तर ३ अपक्ष सदस्यांचा समावेश आहे.

शासनाच्या निर्णयानुसार पक्षीय संख्याबळाचा विचार करून १० टक्के प्रमाणे स्वीकृत सदस्यांच्या जागांचे वाटप केले जाणार आहे. जिल्हा परिषदेत भाजपचे सर्वाधिक २३ सदस्य असून, राष्ट्रवादी-अजित पवार गटाचे चार, दोन अपक्ष, प्रहारचा एक आणि काँग्रेसचा एक सदस्य भाजपसोबत असल्याने सत्ताधारी आघाडीचे संख्याबळ ३१ वर पोहोचते. त्यामुळे स्वीकृत सदस्यांच्या सहा जागांपैकी भाजपच्या वाट्याला तीन जागा येतील.

शिवसेनेचे २१ सदस्य असल्याने त्यांच्या कोट्यात दोन जागा, तर नऊ सदस्य असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एक जागा मिळेल, असा अंदाज आहे. भाजपसोबत मित्रपक्षांची संख्या अधिक असल्याने तीन स्वीकृत सदस्य निवडताना अंतर्गत कलह वाढण्याचीही शक्यता आहे.

सरकारी निर्णयानुसार स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या स्तरावर पार पडेल. ते जि.प.तील मान्यताप्राप्त व नोंदणीकृत पक्ष व गटातील नेत्यांशी सल्ला मसलत करतील. तौलनिक संख्याबळ निश्चित करण्यासाठी जि.प.च्या एकूण सदस्य संख्येला नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येने भागून येणाऱ्या संख्येच्या आधारे पक्षनिहाय स्वीकृत सदस्यांच्या जागा निश्चित केल्या जातील.

या नियुक्त्यांमुळे जि.प.तील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. स्वीकृत सदस्यांना विविध क्षेत्रातील विशेष ज्ञान व अनुभवाच्या आधारे संधी दिली जाईल. त्यामुळे पक्षांकडून योग्य उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू झाली आहे. सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सहकार, आरोग्य, ग्रामीण विकास यांसह विविध क्षेत्रांत कार्यरत व्यक्तींच्या नावांचा प्रामुख्याने यासाठी विचार केला जाऊ शकतो.

भाजप, शिवसेनेत इच्छुक अधिक

विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपसह शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या प्रमुख पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अधिसूचनेनंतर सुरू झालेल्या राजकीय हालचालींमुळे आगामी काळात स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT