छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत माजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या जागा आरक्षित झाल्याने ते यंदाच्या निवडणुकीतून बाहेर झाले आहेत.
या निर्णयामुळे स्थानिक राजकीय समीकरणात मोठा बदल झाला असून, नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आरक्षणाच्या निकालानंतर जिल्ह्यातील विविध पक्षांमध्ये नाराजी आणि चर्चा रंगत आहेत.
Marathwada Political News : जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीकडे चातकासारखी डोळे लावून वाट पहाणाऱ्या अनेकांना आज 'जोर का झटका' बसला आहे. माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके, माजी उपाध्यक्ष केशव तायडे, माजी सभापती किशोर बलांडे, भाजपाचे एल.जी.गायकवाड, रमेश गायकवाड यांचे गट राखीव झाल्याने यांचा पत्ता कट झाला आहे.
तर आरक्षण सोडतीनंतर ज्यांना नशिबाने पुन्हा साथ दिली यामध्ये श्रीराम महाजन, विनोद तांबे, पुनम राजपुत, वैशाली पाटील, संदीप सपकाळ, प्रकाश चांगुलपाये, पंकज ठोंबरे, जितेंद्र जैस्वाल, अविनाश गलांडे, रमेश पवार यांच्यासह काही माजी अध्यक्ष, सभापती राहिलेल्या माजी सदस्यांना पुन्हा जिल्हा परिषदेत येण्याची संधी मिळणार आहे. आजच्या आरक्षण (Reservation) सोडतीनंतर मिनी मंत्रालयात 32 महिला सदस्य एन्ट्री करणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या (Zilla Parisad) 63 गटांच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. विभागीय आयुक्तांनी लोकसंख्येच्या आधारे अनुसूचित जमाती व अनसुचित जातीचे गट या आधीच जाहीर केले होते. अनुसूचित जातीच्या रांजणगाव शेणपुंजी, सावंगी (लातूर), पिंपळगाव पीर, वाळूज, दौलताबाद, करमाड, अंबेलोहळ, पंढरपूर या 8 गटातून महिलांसाठी 4 गटांच्या आरक्षणाच्या सोडतीच्या चिठ्या काढण्यात आल्या.
यामध्ये सावंगी (गंगापूर), करमाड व दौलताबाद व पंढरपूर हे चारही अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव राहिले. तर यानंतर अनुसूचित जमातीच्या तीन गटातून महिला राखीवसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यामध्ये गोंदेगाव व जेऊर या गटाची नावे निघाली. उंडणगाव अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी राखीव राहिला. सान्वी वाघ या मुलीच्या हस्ते इतर मागासवर्ग (ओबीसी) गटाची पहिली चिठ्ठी काढण्यात आली. ती तुर्काबाद गटाची निघाली. यानंतर उर्वरित १६ गटांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
जसजशा चिठ्ठ्या निघत होत्या तसतसे उपस्थित असलेल्या इच्छुकांपैकी काहींचे चेहरे आनंदी तर काहीजण निराश होतांना दिसत होते. यानंतर ओबीसीचा 17 गटातून महिलांसाठीच्या 9 गटाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यामध्ये आडूळ, दावरवाडी, नेवरगाव, शिवना, आमखेडा, ढोरकीन, तुर्काबाद, वडगाव कोल्हाटी उत्तर पूर्व, गोलटगाव हे गट महिलांसाठी राखीव राहिले आहेत. सर्वसाधारणसाठी राखीव राहिलेल्या 35 गटांतून 17 गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले.
आजच्या सोडतीमुळे मागील पंचवार्षिकमध्ये सदस्य राहिलेल्या काही सदस्यांची पुन्हा लॉटरी लागली आहे. तर या पंचवार्षिकमध्ये असलेल्या अनेक सदस्यांची संधी हुकली आहे. जिल्हा परिषदेत आरक्षणामुळे संधी न मिळणारे काहीजण पंचायत समितीमध्ये तरी शिरकाव करू शकतो का? याची चाचपणी करतांना दिसत आहेत. दरम्यान, मिनी मंत्रालयात पुन्हा येण्याची आशा बाळगून असलेल्या माजी अध्यक्षा मीना शेळके, माजी उपाध्यक्ष केशव तायडे, किशोर बलांडे, एल. जी. गायकवाड, शिवाजी पाथरीकर, रमेश गायकवाड, बबन कुंडारे, सुरेश सोनवणे यांच्यासह अनेकांचे गट राखीव राहिल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला आहे.
तर श्रीराम महाजन, विनोद तांबे, पुनम राजपुत, वैशाली पाटील, संदीप सपकाळ, प्रकाश चांगुलपाये, पंकज ठोंबरे, जितेंद्र जैस्वाल, अविनाश गलांडे, रमेश पवार यांच्यासह काही माजी अध्यक्ष, सभापती राहिलेल्या माजी सदस्यांना पुन्हा जिल्हा परिषदेत येण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्या दिग्गज सदस्यांचे गट आरक्षीत राहिलेत ते इतर गट शोधून आपले भवितव्य आजमावणार आहेत.
जि.प.गटांचे आरक्षण
फर्दापूर - सर्वसाधारण महिला, आमखेडा -ना.म.प्र. महिला, गोंदेगाव - अनुसूचित जमाती महिला, अजिंठा - खुला महिला, शिवना - ना.म.प्र. महिला, उंडणगाव - अनुसूचित जमाती, अंभई - ना.म.प्र., घाटनांद्रा - सर्वसाधारण महिला, डोंगरगाव - सर्वसाधारण, भराडी - सर्वसाधारण, अंधारी - सर्वसाधारण महिला, केर्हाळा -सर्वसाधारण महिला, नागद - सर्वसाधारण महिला, करंजखेडा - सर्वसाधारण, चिंचोली लिंबाजी - सर्वसाधारण, पिशोर - सर्वसाधारण, कुंजखेडा - खुला महिला, हतनूर - सर्वसाधारण महिला, जेहूर - अनुसूचित जमाती महिला, देवगाव रंगारी - सर्वसाधारण, बाबरा - ना.म.प्र., वडोद बाजार - ना.म.प्र., पाल - सर्वसाधारण महिला.
गणोरी - सर्वसाधारण, बाजार सावंगी - खुला महिला, गदाना - सर्वसाधारण महिला, वेरूळ - ना.म.प्र., वाकला - सर्वसाधारण महिला, बोरसर - सर्वसाधारण, शिवूर - ना.म.प्र., संवदगाव - सर्वसाधारण महिला, लासूरगाव - सर्वसाधारण महिला, घायगाव - ना.म.प्र., वांजरगाव - सर्वसाधारण - महालगाव - सर्वसाधारण, सावंगी - अनुसूचित जाती महिला, अंबेलोहळ - अनुसूचित जाती, रांजणगाव शेणपुंजी - अनुसूचित जाती, वाळूज बु. - अनुसूचित जाती, तुर्काबाद खराडी - ना.म.प्र. महिला, शिल्लेगाव - सर्वसाधारण महिला, नेवरगाव - ना.म.प्र. महिला.
जामगाव - सर्वसाधारण महिला, शेंदूरवादा -ओबीसी, लाडसावंगी - सर्वसाधारण, गोलटगाव - ना.म.प्र. महिला, करमाड - अनुसूचित जाती महिला, सावंगी - ना.म.प्र., दौलताबाद - अनुसूचित जाती महिला, वडगाव कोल्हाटी (उत्तर-पूर्व) ना.म.प्र. महिला, वडगाव कोल्हाटी (मध्य-पश्चिम) - सर्वसाधारण, पंढरपूर - अनुसूचित जाती महिला, आडगाव बु. - सर्वसाधारण, पिंप्री बु. - सर्वसाधारण महिला, चितेगाव - सर्वसाधारण, बिडकीन - सर्वसाधारण, आडुळ बु. - ना.म.प्र. महिला, पाचोड बु. - सर्वसाधारण, दावरवाडी - ना.म.प्र. महिला, ढोरकीन - ना.म.प्र. महिला, पिंपळवाडी पीर - अनुसूचित जाती, विहामांडवा - सर्वसाधारण, नवगाव - सर्वसाधारण.
1. छत्रपती संभाजीनगर ZP आरक्षण सोडत कधी जाहीर झाली?
आरक्षण सोडत 2025 मध्ये अधिकृतरीत्या जाहीर झाली असून, सर्व प्रभागांचे आरक्षण निश्चित झाले आहे.
2. माजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीबाहेर का झाले?
त्यांच्या प्रभागांना महिला किंवा इतर आरक्षित वर्गासाठी राखीव करण्यात आले आहे.
3. या निर्णयाचा राजकीय परिणाम काय होईल?
स्थानिक पातळीवर नवीन नेतृत्व पुढे येईल आणि जुने समीकरण पूर्णपणे बदलू शकते.
4. आरक्षणात कोणते प्रमुख बदल झाले?
महिलांसाठी आणि ओबीसी वर्गासाठी काही प्रभाग नव्याने राखीव करण्यात आले आहेत.
5. पुढे कोणत्या पक्षांना फायदा होऊ शकतो?
आरक्षणानुसार ज्या पक्षांकडे महिला उमेदवारांची ताकद आहे, त्यांना निवडणुकीत लाभ होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.