छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये शिवसेना-भाजप युतीचेच वर्चस्व राहिले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण, यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये चुरस आहे. नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असताना प्रभागरचनेवर भाजपचा दिसून येणारा प्रभाव शिवसैनिकांना अस्वस्थ करून जात आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. प्रत्येक पक्ष ताकद वाढविण्याच्या तयारीत आहे. त्यात विरोधी पक्षांतील अनेक आजी-माजी पदाधिकारी सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागत आहेत. प्रवेश सोहळे रंगत असतानाच प्रभागरचनेच्या आडूनही फिल्डिंग लावली जात आहे. महापालिकेत ३० वर्षांपासून छोटा भाऊ असलेल्या भाजपने यावेळी मोठी खेळी करत महायुतीत सोबत असलेल्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
महापालिका हद्दीत विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. त्यात दोन भाजपचे, तर दोन शिवसेनेचे आमदार अशी बरोबरी आहे. पण राज्यसभा व विधानपरिषदेच्या माध्यमातून शहरात भाजपकडे आणखी दोन लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांमुळे यंदा निवडणुकीत भाजपलाच जास्त फायदा मिळण्याची चिन्हे आहेत. शहरातील अनेक वर्षांपासून असलेले शिवसेनेचे वर्चस्व संपवून ‘शतप्रतिशत भाजप’ करण्याची रणनीती पुन्हा एकदा आखली जात आहे.
कोरोना संसर्ग, त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडत गेली. त्यात नगरसेवकांची तब्बल एक टर्म वाया गेली. पाच वर्षांच्या प्रशासकीय कारभाराला नागरिकांसोबतच महापालिकेतील आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक कंटाळले आहेत.
सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्यानंतर महापालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. त्यानुसार पहिला टप्पा म्हणजेच प्रभागरचना अंतिम करण्याचे काम सध्या सुरू आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने प्रभागरचनेचे काम सुरू केले, तेव्हाच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या प्रभागरचनेवर आक्षेप घेत सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यानुसार प्रभागरचना तयार केली जात असल्याचा आरोप राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आला होता. प्रत्यक्षात प्रभागरचनेचे नकाशे, व्याप्ती प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात तथ्य असल्याचे समोर आले.
शहराच्या लोकसंख्येनुसार ११५ वॉर्ड होते. त्यात चार वॉर्डांचा एक प्रभाग तयार करण्यात आल्याने २८ प्रभाग चार वॉर्डांचे, तर एक प्रभाग तीन नगरसेवकांचा करण्यात आला आहे. महापालिकेची आगामी निवडणूक २९ प्रभागांनुसार होणार आहे. प्रभागरचनेवर आक्षेप-हरकती घेऊन त्यावर सुनावणी होणार असली, तरी त्यात दोन ते पाच टक्क्यांपर्यंत बदल होतील, असा अंदाज बांधला जात आहे.
त्यामुळे प्रभागरचना भाजपच्या फायद्याचीच तयार करण्यात आली असून, ४०पेक्षा जास्त नगरसेवक भाजपचे निवडून येऊ शकतात, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे प्रभागरचना तयार करताना सत्ताधारी शिवसेनेला विश्वासात घेण्यात आलेले नाही. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत गेल्या ३० वर्षांत शिवसेना-भाजपची (एकसंध शिवसेना) सत्ता आहे. त्यात शिवसेना मोठा भाऊ होता. शिवसेनेचे १३ महापौर झालेले आहेत तर भाजपचे सात महापौर. पण शिवसेनेच्या फुटीनंतर व प्रभागरचनेतील खेळीनुसार यंदाच्या निवडणुकीत भाजप मोठा भाऊ ठरण्याची चिन्हे आहेत.
महापालिका हद्दीत विधानसभेचे चार मतदारसंघ असून, त्यात मध्य, पूर्व-पश्चिम व फुलंब्रीचा काही भाग आहे. मध्य व पश्चिम मतदारसंघांमध्ये शिवसेना तर पूर्व व फुलंब्रीमध्ये भाजपचे आमदार आहेत. आमदारांचे संख्याबळ समान असले तरी भाजपने माजी उपमहापौर संजय केनेकर यांना विधानपरिषदेवर संधी दिली. त्यासोबत राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड मंत्रिपद असल्यापासून शहरात कामे करत आहेत. त्यामुळे भाजपची ताकद शहरात वाढली आहे.
शहरासाठी प्रभागरचनेनुसार ही पहिलीच निवडणूक आहे. यापूर्वी तीन ते दहा हजार मतदारांपर्यंत इच्छुकांना पोचावे लागत होते, पण इच्छुक नगरसेवकांना प्रभागानुसार सरासरी ४० हजार लोकांपर्यंत पोचावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागासाठी एक तगडा उमेदवार (म्हणजेच जुन्या पद्धतीच्या चार वॉर्डांत ओळख असलेला) शोधला जात आहे. तगड्या उमेदवारावर स्वतःचा प्रचार करतानाच, इतर तिघांना मदत करण्याची जबाबदारी असेल, अशी आखणी सर्वच राजकीय पक्षांतर्फे केली जात आहे.
त्यानुसार प्रवेशाचे सोहळे सध्या सुरू आहेत. त्यात सत्ताधारी भाजप-शिवसेनेमध्ये स्पर्धा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा फटका बसत असून, आतापर्यंत पक्षाच्या सात माजी महापौरांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेत उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. सध्या ठाकरे गटाचा एकही लोकप्रतिनिधी शहरात नाही.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचीही मुदत संपली आहे. त्यामुळे ठाकरे गट एकदमच दुबळा झाला आहे. निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे, आर्थिक पाठबळ व पक्ष फुटीनंतर गाजलेल्या गद्दारांच्या मुद्द्यावर सहानुभूती मिळते का, यावरच ठाकरे गटाचे भवितव्य अवलंबून आहे. अपक्ष नगरसेवकांसह छोट्या पक्षांची नव्या प्रभागरचनेत डाळ शिजणार नाही, हेदेखील निश्चित झाले आहे.
जुन्या वॉर्ड पद्धतीमध्ये नगरसेवक म्हणेल तीच पूर्व दिशा होती. आता एका प्रभागात चार नगरसेवक राहणार असल्याने विकासकामांवरून वाद वाढणार आहेत. प्रभागामध्ये कुठल्याही हद्दी राहणार नाहीत. त्यामुळे चार नगरसेवकांना ॲडजेस्ट करताना, प्रशासनाची म्हणजेच अधिकाऱ्यांची तारांबळ उडणार आहे. प्रत्येक विकासकामात नगरसेवकांना रस असतो, एका कामात चार नगरसेवकांनी रस दाखविला, तर संबंधित कंत्राटदाराची काय हाल होतील आणि कामे किती दर्जेदार होतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रभागरचनेवरून ‘कही खुशी, कही गम’ असेच चित्र शहरात आहे. इच्छुक उमेदवार सुरक्षित प्रभागांचा शोध घेत आहेत. प्रभागात सोबत कोण असेल, याचीही आखणी केली जात असून, प्रत्येक प्रभागात दोन महिलांचे आरक्षण राहणार आहे. त्यामुळे महिला उमेदवारांचा शोध घेताना पक्षांची तारांबळ उडणार आहे.
प्रभागरचनेत मोठ्या संख्येने चुका झाल्या असून, त्यावर आक्षेप घेतले जात आहेत. काही प्रभागांचे नकाशे, तर काही प्रभागांच्या व्याप्ती चुकलेल्या आहेत. त्यात दुरुस्ती होणे अपेक्षित असून, दुरुस्ती न झाल्यास मतदारांची तारांबळ उडण्याची शक्यता आहेत. अनेक भाग दोन प्रभागांत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीची फिल्डिंग लावली जात असल्याची चर्चा रंगत आहे. शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा आहे. त्यानुसार भाजपने मध्य मतदारसंघात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. मध्य मतदारसंघात ताकद वाढल्यास आगामी निवडणुकीत भाजप नव्याने दावा करेल, अशी चर्चा रंगली आहे.
प्रभाग क्रमांक २२ सर्वाधिक लोकसंख्येचा, तर प्रभाग क्रमांक २९ सर्वांत कमी लोकसंख्येचा ठरला आहे. प्रभाग क्रमांक २२मध्ये ४६,६७६ तर प्रभाग क्रमांक २९मध्ये २९,१४९ लोकसंख्येचा समावेश करण्यात आलेला आहे. सात प्रभागांमध्ये अनुसूचित जातीच्या समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. यात प्रभाग क्रमांक तीनमध्ये १३,४६७, प्रभाग क्रमांक चारमध्ये १४,३९०, प्रभाग क्रमांक ८मध्ये १२,४२०, प्रभाग क्रमांक ९मध्ये १६,५२५, प्रभाग क्रमांक १८मध्ये ११,३४५, प्रभाग क्रमांक २४मध्ये १९,३८३, प्रभाग क्रमांक २८मध्ये १७,७५७ लोकसंख्या आहे.
महापालिकेने शासनाच्या आदेशानुसार, प्रभागरचना तयार करून नगरविकास विभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता. नगरविकास विभागाने प्रस्तावाला मंजुरी देत तो निवडणूक आयोगाकडे पाठविला. निवडणूक आयोगाने मंजुरी दिली. नगरविकास विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असतानाही प्रभागरचनेवर भाजपचा पगडा कसा, अशा प्रश्न शिवसेनेला पडला आहे.
राज्याप्रमाणेच छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पहिल्यांदाच मोठा भाऊ होण्याची तयारी भाजपने केली आहे. प्रभागरचनेच्या आडून भाजपने शिवसेनेकडे बार्गेनिंग पॉवरही ठेवलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात फारशी ताकद नसली तरी भाजप-शिवसेना महायुतीमध्ये ज्या जागा मिळतील, त्या लढविणे एवढीच पक्षाची भूमिका आहे.
‘एमआयएम’ची २५ वॉर्डांत ताकद आहे. यावेळी ‘एमआयएम’चे कमीत कमी नगरसेवक कसे निवडून येतील, याचीही काळजी प्रभागरचनेतून घेण्यात आली आहे. मुस्लिमबहुल म्हणजेच स्पष्ट कौल मिळणार नाही, अशी प्रभागरचना तयार करण्यात आली आहे.
(Edited by: Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.