Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

CM Eknath Shinde News: अडीच वर्षांत माडीवरून खाली नाही उतरले, दाढीपर्यंत..? शिंदेंचा ठाकरेंवर खोचक पलटवार

Shivsena Politics : तुमच्या अहंकाराची गाडी या दाढीनेच खड्ड्यात घातली आहे...

Shital Waghmare

Dharashiv News : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या शिवसंवाद दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दाढी खेचण्याची भाषा केली होती. ही टीका शिंदे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. धाराशिव येथील शिवसंकल्प मेळाव्यात याच मुद्यावरुन शिंदेंनी उद्धव ठाकरेंची चांगलीच खेचली. जे अडीच वर्षात माडीवरून खाली नाही उतरले, ते माझ्या दाढीपर्यंत कसे पोहचणार? असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. ते म्हणाले, दाढीला पकडून खेचून आणलं असतं, परंतु तुम्ही अडीच वर्ष वर्षाची माडी खाली उतरला नाहीत, मग दाढीपर्यंत कसे पोहोचाल ? तुमच्या अहंकाराची गाडी या दाढीनेच खड्ड्यात घातली आहे दोन वर्षांपूर्वी, असा चिमटाही शिंदे यांनी काढला.

मला बोलायला लावू नका, माझा नाद करू नका, हलक्यात घेऊ नका. तुम्ही हलक्यात घेतलं, परंतु दोन वर्षांपूर्वी जे झालं ते जगानं पाहिल आहे. त्यामध्ये माझा काही स्वार्थ नव्हता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्यासाठी मला ते पाऊल उचलावं लागलं. ही शिवसेना वाचविण्यासाठी, महाराष्ट्रावर लागलेला बेईमानीचा शिक्का पुसण्यासाठी आम्ही निर्णय घेतला.

त्यामुळे रोज मर्द आहोत, मर्द आहोत कशाला सांगता? हे सांगायची वेळ तुमच्यावर का येते ? असा सवालही शिंदे यांनी आपल्या भाषणात उपस्थितीत केला. तुम्ही आरोप करा, हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तुम्हाला कामाने उत्तर देईल. मुख्यमंत्री असलो तरी काल आज आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करीन, असे सांगत लोकसभेच्या पंचेचाळीसहुन अधिक जागा महायुतीच्या निवडून आणायच्या आहेत्, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी उपस्थितींना केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उबाठा म्हणत डिवचले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दाढीवरून छेड काढणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही आजच्या मेळाव्यात वारंवार उबाठा असा उल्लेख करत डिवचण्यात आले. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणात विरोधात निकाल दिल्यानंतर मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे पत्रकारावर संतापले होते.

शिवसेनेचा उल्लेख करताना उबाठा असा उल्लेख करताच हे उबाठा काय आहे? असे म्हणत संताप व्यक्त केला होता. माझे नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, अशा शब्दात त्यांनी सुनावले होते. परंतु दाढीवरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जाहीर भाषणातून त्यांचा वारंवार उबाठा असा उल्लेख करत शिंदेंनी त्यांना डिवचले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT