Eknath Shinde and Ajit pawar Sarkarnama
मराठवाडा

Eknath Shinde News : मुख्यमंत्री पुन्हा अजित पवारांना विसरले?, डबल इंजिन सरकार, असाच केला उल्लेख!

Eknath Shinde and Ajit pawar : आता सगळे फटाके एकत्र आले तरी त्यांचा आवाज निघत नाही, असा टोलाही शिंदेंनी विरोधकांना लगावला.

Jagdish Pansare

Hingoli News : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आमदारांची राज्यातील डबल इंजिन सरकारमध्ये एन्ट्री झाली. तेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारचा ` ट्रिपल इंजिन सरकार` असा आवर्जून उल्लेख करतात. पण गेल्या दोन शासन आपल्या दारी कार्यक्रमातील भाषणात मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारचा उल्लेख डबल इंजिन असा केला. याआधी कोल्हापूरात आणि आता हिंगोली येथील कार्यक्रमात त्यांच्या तोंडून हा उल्लेख झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

विशेष म्हणजे हिंगोलीतील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात दोन्ही वेळा सरकारचा उल्लेख करतांना त्यांनी डबल इंजिनचे सरकार म्हटल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी पसरली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी हिंगोलीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाड्यात तापमान वाढलेले असतांनाही हिंगोलीच्या कार्यक्रमाला चांगली गर्दी जमली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण लोकांना या कार्यक्रमाला येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांनी गाड्या अडवून प्रयत्न केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांसह खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर यांनीही केला. राज्यात आतापर्यंत झालेल्या 22 शासन आपल्या दारी कार्यक्रमातून 5 कोटी 65 लाख लोकांना लाभ मिळाल्याचा दावा शिंदेंनी केला. एकट्या हिंगोली जिल्ह्यात 13 लाख लाभार्थ्यांच्या नोंदी झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इतर राज्याचे मुख्यमंत्री विचारतात, ये शासन आपल्या दारी क्या है, असे म्हणत शिंदेंनी असा उपक्रम राबवणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे अभिमानाने सांगितले.

दीड-पावणे दोन वर्षात आपल्या कामाचा धडाका सुरू असल्याने यात महाविकास आघाडीच्या लवंगी फटाक्यांचा आवाज येत नाही. आता सगळे फटाके एकत्र आले तरी त्यांचा आवाज निघत नाही, असा टोलाही शिंदे यांनी महाविकास आघाडीला लगावला. उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना मी मर्द आहे, हे रोज कशाला सांगता, तुम्ही दिलेले दर्द लोक कसे विसरतील? अशी टीका करतांनाच संवाद करायची वेळ होती तेव्हा लोकांना लांब केलं, आता कसली संवाद यात्रा काढता, असा चिमटाही शिंदे यांनी ठाकरेंना काढला.

माझ कुटंब माझा परिवार नाही, महाराष्ट्रच माझं कुटुंब आणि माझी जबादारी आहे. अन्यायाला वाचा फोडण्याची हिंमत या एकनाथ शिंदेने दाखवली, याची दखल देशाने नाही, तर जगाने घेतली, याचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. 55 ते 60 कॅबिनेट बैठकांमध्ये पाचशेहून अधिक निर्णय जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे घेतले. फेस टु फेस काम करणारा मी आहे, फेसबुक लाईव्ह वरून काम होत नाही, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

जे बोलतो ते करुन दाखवतो. एकदा शब्द दिला की तो फिरवत नाही. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा शब्द मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन दिला होता. तो पुर्ण केला. कुणबी प्रमाणपत्रही आपण देतो आहोत. मराठा आरक्षण टिकणार नाही, असे विरोधक सांगतात, माझे त्यांना आव्हान याची कारणे सांगा, आडवे येऊ नका.

हे आरक्षण कसे टिकेल हे आम्ही सांगतो. टिकणार आरक्षण देण्याच काम मी करुन दाखवलयं. विद्वेशाच राजकारण जास्त काळ चालत नाही. राजकारणाला बळी पडू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. सीएम म्हणजे मुख्यमंत्री नाही, तर काॅमन मॅन. पदाची हवा माझ्या डोक्यात गेलेली नाही, असे सांगतांना भाषणाच्या शेवटी पुन्हा त्यांनी सरकारचा डबल इंजिन असा उल्लेख केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT