Congress News Sarkarnama
मराठवाडा

Congress News : ऐन विधानसभेच्या तोंडावर हिंगोलीत काँग्रेसच्या 'डोक्याला शॉट'; दोन गटांत तुंबळ हाणामारी

Political News : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार प्रज्ञा सातव आणि भाऊराव गोरेगावकर गटातील वाद पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे.

सरकारनामा ब्युरो

Hingoli News : तोंडावर आलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती तयारी केली जात आहे. जागावाटप आणि निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. तर, उमेदवारीसाठी इच्छुकांकडून वरिष्ठांची भेट घेतली जात आहे.

या सगळ्यात महाविकास आघाडीत एकाच मतदारसंघातून अनेक इच्छुकअसल्याचे समोर येत आहेत. त्यामुळे मविआत जागावाटपावरुन दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. त्यातच हिंगोलीमध्ये कॉँग्रेसच्या आढावा बैठकीप्रसंगी दोन गटांतील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे वातावरण काहीकाळ तणावपूर्ण बनले होते. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार प्रज्ञा सातव आणि भाऊराव गोरेगावकर गटातील वाद पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. (Congress News)

हिंगोली शहरात काँग्रेसच्या (Congress ) वतीने शनिवारी सायंकाळी आयोजित आढावा बैठकीत दोन गटांतील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे वातावरण काहीकाळ तणावपूर्ण झाले होते. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, या वादामुळे कुठलाही आढावा, चर्चेविनाच ही बैठक आटोपती घ्यावी लागली.

हिंगोली जिल्हा काँग्रेसमधील दोन गट काही दिवसांपासून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. विधान परिषद सदस्य डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav ) आणि माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या कार्यकर्त्यांतील संघर्ष जिल्ह्याच्या राजकारणात चांगलाच चर्चेत आहे. या दोन गटांमध्ये मनोमिलन करण्याचा वरिष्ठ पातळीवरून झालेला प्रयत्न सपशेल फोल ठरला आहे.

दरम्यान, शनिवारी शिवाजीराव देशमुख सभागृहामध्ये काँग्रेसची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यासाठी काँग्रेसचे मराठवाडा सहप्रभारी कुणाल चौधरी उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. प्रज्ञा सातव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रात्री सुरू झालेल्या या आढावा बैठकीपूर्वी सत्कार कार्यक्रम सुरू होताच काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून घोषणाबाजीला सुरवात झाली. त्यातच काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांना सातव गटातील कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे वातावरण चांगलेच पेटले.

भाऊराव गोरेगावकर यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून संपूर्ण सभागृह डोक्यावर घेतले. कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न होऊनही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती आली नियंत्रणात

दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांकडून दिल्या जाणाऱ्या ‘मुर्दाबाद’, ‘विजय असो’च्या घोषणांमुळे परिस्थिती चांगली तणावपूर्ण बनली. कुणीही कोणाचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. या परिस्थितीत वातावरण तणावपूर्ण झाल्याने तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला बाजूला करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या गोंधळाच्या परिस्थितीत नेत्यांनी मात्र घटनास्थळावरून काढता पाय घेतला. त्यामुळे आढावा बैठक पूर्ण झालीच नाही.

स्थानिक वाद वरिष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी

या प्रकाराबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी धक्काबुक्की झाल्याच्या प्रकाराला दुजोरा दिला. आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे ही तक्रार करणार असून, पोलिस ठाण्यामध्येही तक्रार देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या घटनेमुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सातव आणि गोरेगावकर गटातील वाद पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT