Beed Political News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आष्टी मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे, भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यात चांगला कलगितुरा रंगला. देवेंद्र फडणवीस यांचा बाहुबली असा उल्लेख झाला याचा धागा पकडत पकंजा मुंडे यांनी आपल्या भाषणात मलाही शिवगामी म्हणतात. शिवगामी बाहुबलीची आई असते, आज मला देवेंद्रजी तुमच्या बद्दल ममत्वाचा भाव येत आहे, अशी भावना व्यक्त केली.
मी तुमची लाडकी बहीण आहे, म्हणून तुमच्यासोबत हेलीकाॅप्टरमध्ये आले. आष्टीमध्ये मी का येणार नाही? माझ्या शेतकरी, बीडच्या जनतेसाठी मला बोलावले नसते तरी आले असते. व्यासपीठावर जागा दिली नसती तर समोर बसले असते. पण मी देखील नशीबवान आहे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री आहेत आणि मी मंत्री आहे. त्यामुळे शासकीय कार्यक्रम म्हणून तर आलेच, पण बोलावले नसते तरी जनतेसाठी आलेच असते, याचा पुनरुच्चार पंकजा मुंडे यांनी केला.
आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण मंत्री (Pankaja Munde) पंकजा मुंडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला पकंजा मुंडे येणार की नाही? याची चर्चा सुरू होती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यावरून बीड जिल्ह्यात सुरू असलेले राजकारण, मुंडे विरुद्ध धस वाद पाहता पंकजा मुंडे आष्टीत येणार नाहीत, असे बोलले जात होते.
परंतु पंकजा मुंडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हेलिकाॅप्टरमधून आष्टीत आल्या. सुरेश धस यांनी आपल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली. दिवार चित्रपटातील डायलाॅगबाजी करत 'मेरे पास देवेंद्र फडणवीस है', असे म्हणत त्यांनी धमाल उडवून दिली. त्याच्यानंतर भाषण झालेल्या पंकजा मुंडे यांनी धस यांच्या डायलाॅगबाजीला जशास तसे उत्तर दिले. दवेंद्र फडणवीस यांचा धस यांनी देवेंद्र बाहुबली असा उल्लेख केला, हा धागा पकडत पंकजा मुंडे म्हणाल्या, मलाही बीड जिल्ह्यात शिवगामी म्हणतात, 'मेरा वचन ही मेरा शासन' मी एकदा वचन दिले की कधीही मोडत नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
शिवगामी बाहुबलीची आई असते, त्यामुळे माझ्या मनात देवेंद्रजी यांच्याबद्दल ममत्वाचा भाव निर्माण झाला आहे, असेही त्या म्हणाल्या. बीड जिल्ह्यात महायुतीचे पाच आमदार निवडून आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, मी ही मंत्री झाले. जसा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तुमच्या डोक्यावर आशिर्वादाचा हात आहे, तसा तुमचाही आमच्यावर राहू द्या. तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्हीही खूप मेहनत घेतली, घसा कोरडा होईपर्यंत भाषण केली. पण देवेंद्रजी पहा भाजपाच्या आमदारांना पाडलेल्या दुसऱ्या पक्षाच्या आमदारांसाठी इथे जास्त टाळ्या वाजवल्या जातायेत, असा टोलाही पंकजा मुंडे यांनी लगावला.
व्यासपीठावर उपस्थितीत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा उल्लेख करतांना ज्यांनी माझा पराभव करून खासदार झाले ते बजरंगबप्पा, असा पंकजा मुंडे यांनी केला. तेव्हा गर्दीतून टाळ्यांचा कडकडाट झाला. आमदार संदीप क्षीरसागर यांचे नाव घेतले तेव्हा देखील हाच प्रकार घडला यावर बघा देवेंद्रजी असे म्हणत पकंजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. आष्टीतील ज्या जागेवर सिंचन प्रकल्प आकारास येत आहे, ती जागा 2003 मध्ये लष्कराच्या छावणीसाठी देण्याचा निर्णय तत्कालीन मंत्री जाॅर्ज फर्नांडिस यांनी घेतला होता.
त्याला माझे वडील गोपीनाथ मुंडे यांनी पत्र पाठवून विरोध केला आणि ही शेकडो गावातील जागा वाचली, याची आठवण पंकजा मुंडे यांनी आवर्जून करुन दिली. सुरेशअण्णा धस तुम्ही मला ताईसाहेब म्हणता, मी ही तुम्हाला अण्णा म्हणते. तुम्ही मला तुमच्या मुलाच्या लग्नाला बोलावले होते तेव्हा मी आले होते. आता दुसरा मुलगा सागर यांच्या लग्नाला बोलावले तर येईल, नाही बोलावले तर येणार नाही. शासकीय कार्यक्रम असल्यामुळे मी येणारच होते? कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि मी मंत्री म्हणजे शासन, असा टोलाही पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.