Dharashiv APMC Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Politics : धाराशिव बाजार समितीत सत्ताधारी-विरोधकांत राडा; कार्यालयाला टाळे, काय आहे कारण?

Dharashiv APMC : नंतर झालेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध उपक्रम राबवून प्रगती झाली, मात्र धाराशिव बाजार समितीचा विकास खोळंबला.

Shital Waghmare

Dharashiv Political News : कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ताधारी- विरोधकांत सुविधांच्या अभावावरून जोरदार राडा झाला. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांना भिडल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. त्यातच काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाजार समिती कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन सुरू केल्याने एकच गोंधळ उडाला. या दरम्यान, बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील आणि कार्यकर्त्यांत जोरदार वादावादी झाली. परिणामी संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाजार समितीला टाळे ठोकून ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. (Latest Political News)

या वेळी बाजार समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. धाराशिव (Dharashiv) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कुठल्याही प्रकारचा निधी आलेला नाही. आजतागायत एकही विकासकाम त्या ठिकाणी झालेले नाही. या बाजार समितीमध्ये फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो. त्या आवारात रस्ता, नाली, भाजीपाला लिलावाचे शेड, येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी सभागृह, स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने या सर्वांची मोठी गैरसोय होते. Dharashiv Politics

बाजार समिती परिसरामध्ये संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची सोय, व्यापाऱ्यांना सोयी सुविधा, अंतर्गत नाली व रस्ते, मुख्य प्रवेशद्वार, शेतकऱ्यांना सभागृह, व्यापारी व शेतकऱ्यांसाठी स्वच्छतागृह, जनावरांसाठी निवाऱ्याची सोय, महिला स्वच्छतागृह अशा मूलभूत सुविधा वर्षानुवर्षे मागणी करूनही पुरवल्या गेल्या नाहीत. गोडाऊनची संख्याही अपुरी असल्याने शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. याबाबत वारंवार लेखी निवेदन देऊनही बाजार समितीतील सत्ताधारी आणि प्रशासनाने दखल घेतली नाही.

आधी या मागण्यांसाठी काँग्रेसचे (Congress) कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेशराजे निंबाळकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. बाजार समिती संचालकांच्या कारभारामुळे हा बाजार चार ठिकाणी विखुरला गेला. चार गावच्या शेतीचा माल समितीमध्ये येत नाही. नवीन व्यापारी या ठिकाणी यायला तयार नाहीत. धाराशिवनंतर लातूर (Latur ) कृषी उत्पन्न बाजार समिती विविध उपक्रम राबवून पुढे गेली. परंतु धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठल्याही प्रकारची प्रगती झाली नसल्याचा आरोप या वेळी आंदोलनकर्त्यांनी केला.

काँग्रेसचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर, प्रशांत पाटील, धनंजय राऊत, प्रभाकर लोंढे, अग्निवेश शिंदे, राजाभाऊ शेरखाने यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोनलात सहभागी झाले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत एक रुपयाचा निधी आलेला नाही. वेळोवेळी या समस्यांचे गाऱ्हाणे संचालक मंडळाला निवेदने देऊन मांडले. प्रत्येक वेळी संचालक मंडळाने फक्त प्रयत्न करीत असल्याचा शब्द दिला. उत्पन्न बाजार समितीमध्ये 800 हमालाच्या नोंदी आहेत, पण प्रत्यक्षात 50 जणांनाही काम मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारीही त्रस्त आहेत.

सत्ताधाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराकडे सतत कानाडोळा केला असल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर यांनी केला. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsingh Patil) यांनी मागील चार दिवसांपूर्वी संचालक, सचिव आणि अभियंता यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आराखडा सादर करण्यात आला.

राजेनिंबाळकरांच्या टीकेला उत्तर देताना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील म्हणाले, वरील सर्व कामे पुढील टप्प्यात पूर्ण होतील. बाजार समितीमध्ये 22 गाळ्यांचे काम चालू आहे. प्रस्तावित 45 गाळ्यांचे काम सुरू होणार आहे. या विकासकामातून मिळणारा निधी व बाजार समितीतून विकासकामे केली जाणार आहेत. यासंबंधी संचालक उमेश राजेनिंबाळकर यांना सर्व माहिती देण्यात आली होती. परंतु त्यांनी फक्त राजकीय कांगावा करत हे आंदोलन केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT