Latur Congress organizational reshuffle: लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने लातूरचा गड राखला. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला धूळ चारली. तर विधानसभा निवडणुकीत लातूर शहर मतदार संघातून अटीतटीच्या लढतीत अमित देशमुख यांनी बाजी मारली.
त्यामुळे अर्थातच लातूरमध्ये अमित देशमुख यांचा शब्द पक्षात अंतिम मानला जातो. म्हणूनच त्यांचे विश्वासू अभय साळुंके यांची लातूरच्या जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषदेत काँग्रेसने आपली ताकद दाखवली. महापालिकेत सत्ता तर जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष समोर आला. एकूणच लातूर जिल्ह्यात काँग्रेस आपले अस्तित्व टिकवून आहे. यात अमित देशमुख यांच्या नेतृत्वाचा जितका वाटा आहे तितकाच तो जिल्ह्यातील पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचाही आहे.
महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात पक्षाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बांधणीचे काम सुरू झाले. सृजन संघटन मोहिमे अंतर्गत काँग्रेसने राज्यभरात निरीक्षक पाठवून पक्षाची स्थिती जाणून घेतली. त्यानंतर आता नवे जिल्हाध्यक्ष व कार्यकारणी नियुक्त करत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
लातूर हा काँग्रेसचा कायम बालेकिल्ला राहिला आहे. अमित देशमुख यांची जिल्ह्यावर असलेली पकड काही प्रमाणात सैल झाली असली तरी काँग्रेस भाजप महायुतीला जोरदार टक्कर देत आहे हे नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही दिसून आले आहे.
काँग्रेसने संघटनात्मक बांधणी करताना लातूरच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा अभय साळुंके यांची तर शहराध्यक्षपदी प्रा. शिवाजी जवळगेकर यांची निवड जाहीर केली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभरात ‘संघटन सृजन अभियान’ राबविण्यात आले होते.
या अभियानांतर्गत देशभरातील विविध सेलच्या अध्यक्षपदांची निवड करण्यात आली आहे. संघटन सृजन अभियानांतर्गत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तथा चंदिगड येथील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एच. एस. लकी यांनी लातूरचा दौरा केला होता. त्यांनी आठवडाभर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
या दौऱ्यादरम्यान साळुंके यांना पाठिंबा दिसून आला. साळुंके यांना वर्षभरापूर्वीच जिल्हाध्यक्ष पदाची संधी मिळाली होती. त्यांना पक्षाकडून या पदावर कायम ठेवण्यात आले. शहराध्यक्ष म्हणून ॲड. किरण जाधव यांनी तब्बल 6 वर्षे काम केले. पक्षातील सर्वांनाच कामाची संधी देण्याच्या भूमिकेतून या पदावर बदल करण्यात आला असून, आता प्रा. जवळगेकर यांची निवड करण्यात आली.
प्रा. जवळगेकर हे सध्या स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. या दोन्ही नवनियुक्त अध्यक्षांच्या निवडीनंतर माजी मंत्री दिलीपराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार अमित देशमुख आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी अभिनंदन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.