Jalna Politics News : प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यात सृजन अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी देशभरातली काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी पाठवले जात आहे. मात्र या मोहिमेला जालन्यात गालबोट लागले.
भाजपाला मदत केल्याच्या आरोपावरून कारवाई करण्यात आलेल्या निलंबित महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी खासदार कल्याण काळे यांच्यासमोरच जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यावर आरोप करत जाब विचारला.
यामुळे पारा चढलेल्या देशमुख यांनी थेट पायातला जोडा काढून तो उगारण्याचा प्रयत्न केला आणि बैठकीतील वातावरण चिघळले. जालना महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेस गटनेत्यासह नऊ नगरसेवकांनी स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपाला मदत केली. पक्षाची नाचक्की झाल्यामुळे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचे पद धोक्यात आले.
देशमुख यांच्या अहवालावरूनच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांच्यासह पक्षाच्या नऊ नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले. यामुळे जिल्हा काँग्रेस आणि निलंबित नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये असलेली खदखद बैठकीच्या निमित्ताने बाहेर आली.
संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून काँग्रेसचे वरिष्ठ नेते, निरीक्षक जिल्ह्यातील नेतृत्वासोबत चर्चा करत पुढील निवडणुकांची रणनीती आखत असतानाच जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिला पदाधिकारी नंदा पवार आणि आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यात शाब्दिक भडका उडाला.
नंदा पवार यांनी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्याबद्दल आर्वच्य भाषा वापरल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे संतापलेल्या देशमुख यांनी चक्क पायातील बूट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांना रोखले. पण यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते चांगलेच संतापले. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाचे निरीक्षक हेमंतसिंह पटेल, खासदार कल्याण काळे यांच्या समोरच हा गोंधळ झाल्याने हीच का काँग्रेसची सृजनशीलता? असा सवाल केला जात आहे.
जालना महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरुन भाजपला मदत केल्याचा ठपका ठेवत महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप करत नंदा पवार यांनी व्यासपीठावर जाऊन जिल्हाध्यक्षाना जाब विचारला. त्यावेळी, दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यातूनच महिलेकडून आक्षेपार्ह शब्दाचा वापर झाल्याने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख चांगलेच संतापले. रागाच्या भरात त्यांनी पायातील बूट काढण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसमधील या राड्याने जिल्ह्यात स्थानिक नेत्यांचा वचक आणि नियंत्रण पक्षावर राहिलेले नाही, याची चर्चा आहे. आता पक्षाचे निरीक्षक पक्ष श्रेष्ठींना काय अहवाल देतात? आणि त्यातून कुठले मोठे संघटनात्मक बदल जिल्ह्यात होतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.