Ashok Patil Nilangekar Sarkarnama
मराठवाडा

Nilanga Assembly Constituency : अशोक पाटील निलंगेकर यांची अखेर माघार! काँग्रेसच्या अभय साळुंके यांचा जीव भांड्यात

Congress leader Ashok Patil Nilangekar withdrew : अशोक पाटील निलंगेकर यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला होता. तर त्यांच्या पत्नी संगीता निलंगेकर यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये खळबळ उडाली होती.

Jagdish Pansare

राम काळगे

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या निलंगा मतदार संघात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभयसिंह साळुंके यांच्या विरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी निलंगेकर यांनी अर्ज मागे घेत महाविकास आघाडी सोबतच राहणार असल्याचे जाहीर केले.

निलंगेकर यांच्या माघारीने मतदार संघामध्ये आता महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. (Congress) दरम्यान अशोक पाटील निलंगेकर यांनी माघार घ्यावी यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, लातूरचे खासदार डाॅ. शिवाजी काळगे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख,अमित देशमुख यांनी प्रयत्न केले होते. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अशोक पाटील निलंगेकर यांना निलंगा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांना यश आले नाही.

त्यामुळे काँग्रेसने यावेळी भाकरी फिरवण्याचा निर्णय घेत अशोक पाटील निलंगेकर यांचा पत्ता कट केला. त्यानंतर समर्थकांच्या नाराजी आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आग्रहानंतर अशोक पाटील निलंगेकर यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला होता. तर त्यांच्या पत्नी संगीता निलंगेकर यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये खळबळ उडाली होती.

गेल्या तीन चार दिवसापासून अशोक पाटील निलंगेकर यांनी माघार घ्यावी यासाठी लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून निलंगेकर यांच्या माघारी नंतर काँग्रेस महाविकास आघाडीचे अभयसिंह साळुंके यांची बाजू भक्कम झाल्याचा दावा केला जात आहे. (Latur) माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा राजकीय वारसा घेऊन निलंग्यातून काँग्रेसचे राजकारण करणाऱ्या अशोक पाटील निलंगेकर यांना उमेदवारी नाकारत निलंगेकर घरात उमेदवारी देण्याची परंपरा काँग्रेसने 62 वर्षानंतर खंडित केली.

निलंगेकर यांच्या माघारी मागे अनेक कारणे असल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे. यापैकी एक म्हणजे माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपने लातूर शहर मतदार संघातून उमेदवारी दिलेली आहे. निलंगेकर यांच्या बंडखोरीचा फटका लातूरमध्ये सुनबाईला बसू नये यासाठी चाकूरकरांनी अशोक पाटील निलंगेकर यांना वडीलकीचा सल्ला देत माघार घ्यायला लावली, असे बोलले जाते अशोक पाटील निलंगेकर यांना मानणारा मतदार संघात मोठा वर्ग आहे.

2014 मध्ये निलंगेकर यांना 49 हजार तर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रसचे उमेदवार म्हणून 65 हजार मते मिळाली होती. त्यांच्या मागे मतदारसंघांमध्ये असलेल्या समर्थकांची संख्या पाहता निलंगेकर यांची बंडखोरी काँग्रेस उमेदवाराला महागात पडली असती. आता महायुतीचे संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी काँग्रेसच्या अभयसिंह साळुंके यांची थेट लढत होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी संभाजी पाटील निलंगेकर यांचा विजय रोखणार का? की मग भाजप ही जागा आपल्याकडे राखत हॅट्रिक साधणार ? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT