Basavraj Patil, Congress Meeting Sarkarnama
मराठवाडा

Congress Politics : बसवराज पाटलांचं चाललंय तरी काय?

Basavraj Patil : काँग्रेसच्या बैठकीला दांडी मारूनही कुठल्याही नेत्याकडून त्यांचा उल्लेखही नाही, बसवराज पाटील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत किती तथ्य?

Jagdish Pansare

Latur Congress News :

राज्यात काँग्रेसची कामगिरी पाहिली तर खरे त्यांनी जास्त सक्रिय होऊन काम करण्याची गरज आहे. प्रत्यक्षातील चित्र वेगळे आहे. काँग्रेसला कायम गटबाजीचे ग्रहण लागलेले असते. त्यामुळेच की काय लातूरमधील काँग्रेसच्या विभागीय मेळाव्याकडे कार्याध्यक्ष बसवराज पाटील फिरकलेच नाहीत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये काँग्रेसच्या (Congress) विभागीय मेळाव्याचे आयोजन केले होते. लोकसभेच्या राज्यातील सर्व 48 जागा जिंकण्याच्या दृष्टीने तयारी लागा, असे आदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि बैठकीसाठी आलेल्या इतर नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळे नेते, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असला तरी खुद्द कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री बसवराज पाटील (Basavraj Patil) यांची मेळाव्याकडे पाठ काही वेगळेच सांगून जाते.

बसवराज पाटील हे लवकरच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकली. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लातूर (Latur) जिल्ह्यातील एक मोठा नेता भाजपमध्ये दाखल होणार असेल तर हे चित्र काँग्रेससाठी नक्कीच आशादायक ठरणार नाही. आधीच काँग्रेस लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) पूर्ण ताकदीने लढत नाही, सेटलमेंटचे राजकारण केले जाते, असा आरोप स्थानिक नेत्यांवर केला जातो.

त्यात काँग्रेसच्या कार्याध्यक्षांची विभागीय बैठकीला दांडी आणि त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा हे काँग्रेससाठी चांगले संकेत नाहीत. काँग्रेसचे राज्य कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री बसवराज पाटील-मुरुमकर हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असली तरी त्याबाबत त्यांनी जाहीरपणे अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तरीही त्यांच्या पक्षांतराची तयारी पूर्ण झाल्याचे बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लातूर जिल्ह्यातील मोठे प्रस्थ, तसेच माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांचे मानसपुत्र म्हणून बसवराज पाटील मुरुमकर यांची ओळख आहे. धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव मातब्बर नेते म्हणून बसवराज पाटील यांचे नाव घेतले जाते. लोकसभा अथवा विधानसभा निवडणूक आली, की त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सातत्याने सुरू होते. पण विरोधकांकडूनच अशा अफवा पसरवल्या जातात, असे त्यांचे समर्थक सांगतात.

आतापर्यंत या चर्चेकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. काँग्रेस पक्ष व त्यांच्या विचारावर बसवराज पाटील यांची असलेली निष्ठा पाहता त्यांच्याबद्दल शंका घ्यावी, असा प्रसंग यापूर्वी कधी आला नव्हता. यावेळी मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गांभीर्याने सुरू आहे. अतिशय चतुर राजकारण्यांमध्ये बसवराज यांची गणना होते. एकेकाळी धाराशिव जिल्ह्यातील दिग्गज नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याशी दोन हात करीत बसवराज पाटील यांनी त्यांना आव्हान दिले होते.

राजकारणात चढ-उतार येत असतात. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे बंधू कार्य करीत असले तरी हे पद त्यांना पुन्हा एकदा मिळाले आहे. शिवाय त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. निवडणूक लढवून ते युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष झाले आहेत. 2009 मध्ये उमरगा मतदारसंघ आरक्षित झाला. त्यामुळे पक्षाने औसा मतदारसंघातून बसवराज यांना उमेदवारी दिली. तेथील निष्ठावंतांना डावलून पक्षाने प्राधान्य दिले असले तरी त्या संधीचे सोने झाले.

गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी त्यांना पक्षाने संधी दिली. धाराशिवचे खासदार शिवसेनेचे आहेत, त्यामुळे ही जागा महाविकास आघाडीतील शिवसेनेलाच सुटण्याची शक्यता आहे. तरीही पक्षप्रवेशाच्या वावड्या कशासाठी, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. लातूरमध्ये आठ जिल्ह्यांसाठी झालेल्या काँग्रेस मेळाव्याला अनुपस्थित राहिल्याने बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिक उधाण आले आहे.

विशेष म्हणजे बसवराज यांच्या विभागीय बैठकीतील अनुपस्थितीचा साधा उल्लेखही कुठल्या नेत्याने केला नाही. बसवराज पाटील यांच्याकडूनही बैठकीला न येण्याचे कारण किंवा खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकता शिल्लक असल्याचे बोलले जाते.

(Edited by Avinash Chandane)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT