Congress Marathwada Politics News Sarkarnama
मराठवाडा

Congress Political News : संभाजीनगरात काँग्रेसची वाटचाल `झिरो टू हिरो` च्या दिशेने..

Jagdish Pansare

Chhatrapati Sambahjinagar Political News : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर कधीकाळ काँग्रेसचे एकहाती वर्चस्व होते. खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा झेंडा फडकत होता. मात्र 2014 मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले आणि जिल्ह्यातील काँग्रेसच्या वर्चस्वाला ग्रहण लागले. संभाजीनगरात शिवसेना स्थापन झाल्यापासून काँग्रेसला एक अपवाद वगळता पक्षाचा खासदार निवडून आणता आला नाही. अशीच अवस्था काँग्रेसची विधानसभा आणि महापालिका, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्येही झाली.

मराठवाड्याच्या राजधानी सारखे महत्त्वाचे आणि कधीकाळी अधिराज्य गाजवलेल्या संभाजीनगरात काँग्रेसचा (Congress) एकही खासदार, आमदार नसल्याचे शल्य राज्य आणि केंद्रातील नेतृत्वालाही बोचत होते. सातत्याने निवडणुकीत अपयश वाट्याला येत असल्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनीही जिल्ह्याकडे पाठ फिरवली होती. परिणामी काँग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते पराभूत मानसिकतेतच वावरत होते. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असताना महाविकास आघाडीचा चमत्कार झाला.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी सत्ता स्थापन केली. अडीच वर्षाच्या या सत्तेने काँग्रेसला जणू संजीवनीच मिळाली. या काळात पक्षाच्या वाटेला आलेल्या मंत्रिपदाचा पुरेपूर फायदा काँग्रेसने संघटन वाढवण्यासाठी त्या त्या नेत्यांनी राज्यात आणि मराठवाड्यात केला. दुर्दैवाने संभाजीनगर जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार, खासदार नसल्याने राज्य पातळीवर या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळू शकले नाही. महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 13 खासदार निवडून आणत काँग्रेस महाविकास आघाडीतला सर्वात मोठा पक्ष ठरला.

मराठवाड्यात लोकसभेच्या तीन जागा लढवत या तीनही ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला. (Chhatrapati Sambhajinagar) संभाजीनगर लोकसभेची जागा काँग्रेसला मिळाली असती तर मराठवाड्यात महायुतीला `क्लीन स्वीप` दिला असता, असा दावा माजीमंत्री काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांनी नुकताच केला होता.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष असलेले डॉक्टर कल्याण काळे हे लोकसभेच्या जालना मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांच्या या विजयाने जिल्हा काँग्रेसलाही उभारी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयाच्या टॉनिकमुळे जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांचा उत्साह कमालीचा वाढला आहे.

यातूनच आता भरारी घेत जिल्ह्यात `झिरो` असलेली काँग्रेस `हिरो` होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. एकही आमदार नसलेल्या संभाजीनगर जिल्ह्यातील एक- दोन नव्हे तर नऊ पैकी सहा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. मराठवाडा आणि राज्यात आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी पेक्षाही विधानसभेसाठी सर्वाधिक इच्छुकांची गर्दी काँग्रेसकडे असल्याचे पहायला मिळते. लोकसभा निवडणुकीनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमबॅक करण्याच्या चालून आलेल्या संधीचे काँग्रेस नेते सोनं करते का ? हे पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT