Chandrashekhar Bawnkule, Ambadas Danve  Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On BJP News : तेव्हा शिवसेनाप्रमुख नव्हते, हे तुम्ही भाग्य समजा; बावनकुळेंच्या ट्विटनंतर दानवेंनी सुनावले..

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रा समारोप सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला डिवचणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या शिवसेनेची काँग्रेस व्हायला लागली, तर मी माझे दुकान बंद करेल` अशी सडेतोड भूमिका मांडली होती.

महाविकास आघाडी व इंडियाचे नेते राहुल गांधी यांच्या मुंबईतील आजच्या शिवाजी पार्क येथील सभेला हजर राहणार आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे सगळे नेतेही या सभेसाठी उपस्थितीत असणार आहेत. हे टायमिंग साधत बावनकुळे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ व्हायरल करत ठाकरे गटावर पुन्हा एकदा निशाणा साधला. त्याला ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. (Ambadas Danve On BJP News)

2014 साली विजयाच्या धुंदीत एका फोनवर तुम्ही युती तोडली, तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख देहाने भूतलावर नव्हते. हे तुम्ही भाग्य समजा. याउपर जाऊन राष्ट्रवादीचा आवाजी मतदानाने पाठिंबा घेऊन आपण 2014 साली सरकार स्थापन केले होते, हे लोकांना लक्षात आहे. तेव्हा मोठे साहेब असते तर ज्या भाषेत तुमच्यावर प्रहार झाला असता, तो तुम्हाला सहन झाला नसता. उगाच त्यांचे दाखले कशाला देता, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे.

त्यांनी हयातभर भाजपच्या दावणीला पक्ष बांधण्यासाठी, तुमच्या पालख्या वाहण्यासाठी, तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती. ही देखील त्यांचीच शिकवण आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा खोटा पुळका आहे तुम्हाला, जर हे प्रेम खरे असते तर एव्हाना तुम्ही त्यांना भारतरत्न देऊन मोकळे झाले असता, असा टोलाही दानवे यांनी लगावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बावनकुळे यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या शिवाजी पार्क येथील सभेपुर्वी ठाकरे गटाला डिवचण्यासाठी ट्विट केले होते. यात शिवतीर्थ हे महाराष्ट्रातील एक तीर्थस्थळ आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे या मैदानाशी भावनिक नाते आहे. स्वातंत्र्य लढ्याचे नायक वीर सावरकर यांच्या ओजस्वी वाणीतून राष्ट्रप्रेम, हिंदुत्व आणि देशभक्तीचा पहिला हुंकार इथूनच उठला होता.

याच शिवतीर्थावरून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस आणि त्यांच्या हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली होती. त्या बाळासाहेबांच्या जंयती किंवा पुण्यतिथीला राहुल गांधी अभिवादन का करत नाहीत? हे उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांना विचारतील का? किंवा आज ते शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील का? असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांच्या मनात आहे, असे म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

SCROLL FOR NEXT