Dasara Melava 2023 Sarkarnama
मराठवाडा

Dasara Melava 2023 News : ठाकरे-शिंदेंच्या भाषणात दिसला जरांगे इफेक्ट..

Jagdish Pansare

Maharashtra Political News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात झालेल्या सभा, मनोज जरांगे पाटील यांनी समाजाची केलेली एकजूट याची दखल मुंबईत आज झालेल्या दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्यात घेतली गेली. (Dasara Melava Rally Speech News) उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणाचा उल्लेख करत ते मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास दिला.

मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून सुरू केलेल्या मराठा आंदोलनाने सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही हलल्याचे आजच्या दसरा मेळाव्यातील भाषणातून दिसून आले.

उद्धव ठाकरे यांनी समजूतदारपणे आंदोलन सरू ठेवल्याबद्दल आणि धनगर आरक्षणाचा मुद्दाही हाती घेतला म्हणून त्यांना धन्यवाद दिले. तर तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन दिला.

त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना घ्यावी, लागणार हे स्पष्ट झाले आहे. (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी आपल्या तासाभराच्या भाषणाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षणाच्या विषायाला हात घातला.

मनोज जरांगे यांचा खास उल्लेख करत ठाकरेंनी त्यांना धन्यवाद दिले. जरांगे पाटलांना धन्यवाद देतो. समजूतदारपणाने त्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. आज आणखी चांगली गोष्ट त्यांनी केली, ती म्हणजे धनगरांना साद घातली.

(Maharashtra) अंतरवालीतील शांततेत सुरू असलेल्या आंदोलकांवर या सरकारने लाठ्या, बंदूका चालवल्या, महिला, मुले, तरुणांची डोकी फोडली. मी मुख्यमंत्री असतांना मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न होताच, पण मी कधी लाठीहल्याचा आदेश दिला होता का? आदेश दिल्याशिवाय पोलीस लाठीहल्ला करत नाही, मग जालन्यात लाठीहल्याचा आदेश देणारा जनरल डायर कोण होता? असा सवाल ठाकरेंनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कश्मिरमध्ये अतिरेक्यांवर चालवतात त्या छऱ्यांच्या बंदूका मराठा आंदोलकांवर चालवल्या गेल्या. मराठा आरक्षणाचा विषय दिल्लीतच सुटू शकतो. मराठा, धनगर, ओबीसी सगळ्या वंचित जातींना एकत्र घ्या आणि द्या त्यांना न्याय, असे आवाहन करतांनाच उद्धव ठाकरे यांनी जरांगेंना पुन्हा धन्यवाद दिले. भाजपच्या जातीपातीचे राजकारण गाडून टाकण्यासाठी जरांगे यांनी सगळ्यांना सोबत घेण्याची भूमिका घेतली.

आपण सगळे मिळून जाती-पातीच्या भिंती पाडू, असा शब्द देत उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला आपला पुर्ण पाठिंबा असल्याचे दसरा मेळाव्यातून स्पष्ट केले. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर भावनिक होत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला. मराठा समाजाला हक्काचे, कुणाच्याही वाट्याचे नाही तर टिकणारे आरक्षण देण्यासाठी मी कटीबद्ध आहे.

मी देखील शेतकरी मराठा कुटुंबातील आहे, मला तुमच्या वेदना कळतात. न्यामुर्ती शिंदे समिती २४ तास मराठा आरक्षणासाठी काम करते आहे. सुप्रीम कोर्टातही आपली याचिका दाखल करुन घेण्यात आली आहे, असे सांगत मराठा आरक्षण दिल्याशिवास स्वस्थ बसणार नाही, असा शब्द दसरा मेळाव्याच्या भाषणातून दिला.

एकूणच मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात उभे केलेल वादळ, मराठा समाजाची एकजूट आणि न पेलणारे, झेपणारे आंदोलन करण्याचा दिलेला इशारा, याचा इफेक्ट ठाकरे आणि शिंदेच्या भाषणात दिसून आला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT