Paithan Constituency : Vilas Bhumre-Datta Gorde News Sarkarnama
मराठवाडा

Paithan Assembly Constituency 2024 : पैठणमध्ये उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला ; दत्ता गोर्डे देणार भुमरेंना टक्कर!

Bhumare vs Gorde Rivalry in Paithan Assembly: भुमरे यांनी संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवत विजय मिळवला. त्यानंतर विलास भुमरे यांना शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. पैठण मतदार संघाच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षापासून दत्ता गोर्डे आणि भुमरे हे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या पैठण मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अखेर सुटला. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले दत्ता गोर्डे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही या मतदारसंघावर दावा केला होता. मात्र संदिपान भुमरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडात सहभागी होत उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याचा त्यांचावर आरोप आहे.

या गद्दारीची परतफेड करण्यासाठी पैठणमधून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचाच उमेदवार असणार हे निश्चित होते. अखेरच्या क्षणी दत्ता गोर्डे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. (Paithan) शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गोर्डे यांना पक्षाचा `एबी` फॉर्म दिला. त्यानंतर आता पैठण मधील चित्र स्पष्ट झाले असून शिवसेनेचे विलास भुमरे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दत्ता गोर्डे अशी लढत होणार आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे हे बंडाच्या पावित्र्यात आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ते अपक्ष उमेदवारी दाखल करतात? यावर पैठण मधील लढत तिरंगी होणार की दुरंगी ? हे ठरणार आहे.

विधानसभेच्या पैठण मतदार संघावर 1990 पासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. बबनराव वाघचौरे यांनी पहिल्यांदा 90 मध्ये पैठण मधून निवडणूक लढवत शिवसेनेचा भगवा फडकवला होता.

त्यानंतर 95 ते 2019 अशा एकूण सहा टर्म संदिपान भुमरे यांनी पैठण मधून निवडणूक लढवली. पैकी 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय वाघचौरे यांच्याकडून झालेला पराभव वगळता पाच निवडणुका भुमरे यांनी जिंकल्या आहेत. (Shivsena) त्यामुळे पैठण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नावारूपाला आला. शिवसेनेच्या बंडानंतर होणाऱ्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत संदिपान भुमरे यांनी आपल्या मुलासाठी हा मतदार संघ मोकळा केला.

भुमरे यांनी संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवत विजय मिळवला. त्यानंतर विलास भुमरे यांना शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. पैठण मतदार संघाच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षापासून दत्ता गोर्डे आणि भुमरे हे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. गोर्डे यांनी भुमरे यांच्या मंत्रिपदाच्या काळातील अनेक कामांवर आक्षेप घेत त्यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत.

भुमरे यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळत गोर्डे यांना विधानसभेची निवडणूक लढवायची असल्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करत असल्याचे म्हटले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत दत्ता गोर्डे यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना 69,264 एवढी मते मिळाली होती. शिवसेनेच्या संदिपान भुमरे यांना लढत देत त्यांनी जेरीस आणले होते. मात्र 14,139 मतांच्या फरकाने संदिपान भुमरे यांनी आपला पाचवा विजय मिळवला होता.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर संदिपान भुमरे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. महायुती सरकारमध्ये भुमरे यांना मंत्री पदही मिळाले. शिवसेनेकडून सहा वेळा पैठण मधून उमेदवारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये रोजगार हमी योजना मंत्री म्हणून कॅबिनेट पदी नियुक्ती मिळाल्यानंतरही भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातो. याचाच बदला घेण्यासाठी दत्ता गोर्डे यांना राष्ट्रवादी मधून काही महिन्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश देण्यात आला.

शिवसेनेकडून पैठण मध्ये दत्ता गोर्डे यांच्याशिवाय मनोज पेरे हे देखील इच्छुक होते. मात्र पक्षाने गोर्डे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. सहा वेळा निवडणूक लढवलेल्या संदिपान भुमरे यांच्याऐवजी आता त्यांचे चिरंजीव विलास भुमरे हे मैदानात असणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दत्ता गोर्डे त्यांना कशी लढत देतात? शिवसेनेचा बालेकिल्ला उद्धव ठाकरे पक्षात झालेल्या बंडानंतर आपल्याकडे कायम ठेवतात की मग एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा मतदारसंघ जिंकते? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. राज्यातील लक्षवेधी लढतीपैकी पैठणमधील लढत असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT