Ashok Chavan-Shrijaya Chavan Sarkarnama
मराठवाडा

Shrijaya Chavan : अशोक चव्हाणांसाठी मुलीचे राजकारणातील लाँचिंग सोपे नाही...

Jagdish Pansare

Nanded, 20 July : माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभेतील खासदार अशोक चव्हाण यांनी आपली मुलगी श्रीजया हिच्या राजकीय लाँचिंगची जोरदार तयारी सुरू केली आहे. भोकर या आपल्या हक्काच्या मतदारसंघातून यावेळी श्रीजया निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित समजले जात आहे. पण मुलीचे राजकारणातील हे पहिले पाऊल एवढे सोपे नाही, याची अनुभूती सध्या श्रीजया यांना येत आहे.

भोकर या मतदारसंघात एका कार्यक्रमानिमित्त फिरत असताना मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून समाजात असलेल्या रोषाला श्रीजया चव्हाण (Shrijaya Chavan) यांना सामोरे जावे लागले. मराठा तरुणांनी श्रीजया यांची गाडी अडवत एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी सुरू केली. बंदोबस्तावर असलेल्या महिला व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची घोषणाबाजी सुरूच होती.

आंदोलक श्रीजया यांच्याशी चर्चा करु इच्छित होते, मराठा आरक्षणावर तुमची भूमिका काय? ते आम्हाला कळलं पाहिजे, अशी मराठा तरुणांची मागणी होती. यावर श्रीजया यांनी मराठा तरुणांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असून त्यासाठी आपण निश्चित आवाज उठवू, अशी ग्वाही श्रीजया यांनी आंदोलन करणाऱ्या मराठा तरुणांना दिली, त्यानंतर त्या पुढील कार्यक्रमासाठी निघून गेल्या.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपचा दारूण पराभव झाला. अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशानंतर भाजपला नांदेडची जागा गमवावी लागली, याचा सगळ्यानाच धक्का बसला. मराठा आरक्षण, चव्हाण यांनी काँग्रेसला दिलेली सोडचिठ्ठी निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आवडली नाही. याचा फटका जिल्हाभरात भाजपला बसल्याचे निवडणूक निकालावरून दिसून आले.

आगामी विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघात याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अशोक चव्हाण यांनी तयारी सुरू केली आहे. दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपला दूर ठेवण्याच्या अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांवरून ते स्पष्टही झाले.

मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील महायुती सरकारबद्दल असलेला राग अजूनही गेलेला नाही, हे श्रीजया चव्हाण यांच्यासमोर घडलेल्या घोषणाबाजी आणि आंदोलनातून दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव पाहता अशोक चव्हाण यांच्यासमोर भोकर मतदारसंघ राखणे आणि मुलीला आमदार करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT