Chhatrapati Sambhajinagar News : केंद्रातील मोदी सरकार डिलिमिटेशनचे बिल संसदेत आणण्याच्या तयारीत आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत या बिलाला मंजुरी देण्यात आली आहे. आता लोकसभा आणि राज्यसभेत हे बिल मंजूर करून घेण्यासाठी सरकारने वेगाने पावले टाकायला सुरूवात केली आहे. बिलाच्या मंजुरीसाठी 360 खासदारांचा पाठिंबा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावांचा उल्लेख करत संजय राऊत यांनी डिलिमिटेशनचे बिल हे राष्ट्रद्रोही असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारला धारेवर धरले. आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत; शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ असल्याने संघर्ष आणि निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत, नाहीतर राष्ट्रद्रोही डिलिमिटेशन बिल अशा भ्रष्ट पद्धतीने संसदेत आणण्याचे धाडस झाले नसते.
डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला भाजपचा कट आहे. जो कोणी याला पाठिंबा देईल, तो देशाच्या जनतेशी विश्वासघात करत आहे… ते २१व्या शतकातील सगळ्यात मोठे गद्दार म्हणून ओळखले जातील! म्हणून प्रत्येक देश प्रेमी लोकशाही वादी पक्षाने सभागृहात डिलिमिटेशनला ठोकरून काढले पाहिजे. 'इतिहास गद्दारांची नावे सदैव लक्षात ठेवतो, गद्दारीबाबत केलेले खुलासे हवेत विरून जातात', अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) आणि महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्याची तयारी सुरू केली आहे.
यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2026 या कालावधीत बोलावण्यात आले आहे. 27 नोव्हेंबरच्या महत्त्वाच्या घडामोडीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने डिलिमिटेशनशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे.
लोकसभेतील सदस्यसंख्या 543 वरून वाढवून कमाल 850 पर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे. सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा सुमारे 50 टक्क्यांनी वाढवूनही 2051 पर्यंत राज्यांचा जागांमधील सध्याचा प्रमाणात्मक वाटा कायम ठेवण्याची तरतूद प्रस्तावित आहे.
सरकारसमोरील पहिली कसोटी लोकसभेत 360 च्या आसपासचे विशेष बहुमत मिळविण्याची आहे. त्यानंतर राज्यसभेतील 164 च्या आसपासचा आकडा गाठावा लागेल. यामुळेच सरकार विरोधी पक्षांतील प्रादेशिक पक्षांशी संपर्क साधून राजकीय सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.