Maratha Reservation News Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation News : इम्तियाज जलील यांच्या राजीनाम्याची मागणी; मराठा मावळ्यांची घरावर धडक...

Jagdish Pansare

MP Imtiaz Jaleel News : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होत असून, लोकप्रतिनिधींच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. (Maratha Reservation News) छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत राजीनामा द्यावा, अशी मागणी करत मराठा मावळा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट त्यांच्या घरावर धडक दिली.

इम्तियाज जलील यांना जेव्हा मराठा आंदोलक आल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी त्यांना घरात बोलावले. (Imtiaz Jaleel) मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचे सांगत लोकसभेत मीच या विषयावर आवाज उठवू शकतो. सत्ताधारी पक्षाचे खासदार मराठा आरक्षणावर संसदेत बोलू शकत नाहीत. (AIMIM) माझ्या राजीनाम्याने सत्ताधाऱ्यांना तर आनंदच होईल.

जे महिला आरक्षण सध्या मिळणारच नाही, ते जाहीर करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले होते. (Marathwada) तसेच विशेष अधिवेशन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी बोलवावे, अशी मागणी आपण करणार असल्याचे इम्तियाज यांनी मराठा आंदोलकांना सांगितले. मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आताचा नाही तर मी आमदार असल्यापासून मराठा आरक्षणावर बोलतो आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, कारण राज्यातील दीडशे मराठा नेते जे सत्ता आणि पद उपभोगून अब्जाधीश झाले तो नाही, तर ज्यांना आजही शिक्षण, नोकरीसाठी झगडावे लागते, त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही माझीही भूमिका आहे. माझा राजीनामा देऊन आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, उलट या विषयावर बोलणारा एक खासदार कमी झाला म्हणून सत्ताधाऱ्यांना आनंदच होईल, असा चिमटाही इम्तियाज यांनी काढला.

मराठा समाजातील तरुणांनी संयम राखावा, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही इम्तियाज यांनी केले. मराठा समाज हा लढवय्या आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी या समाजाला लढायला शिकवले आहे. शांततेच्या मार्गाने लढा सुरू ठेवला तर सरकारला तुमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. कोणीही टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी तुमच्या पश्चात कुटुंबाचे काय होईल? याचा एकदा विचार करावा, असे आवाहनही इम्तियाज जलील यांनी केले.

दरम्यान, काल हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर राज्यातील इतर खासदारांनीही राजीनामे द्यावेत, मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवावा, यासाठी मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. इम्तियाज जलील यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांनी त्यांच्या घरासमोर घोषणाबाजी केली. इम्तियाज यांनी आंदोलकांना घरात बोलवून त्यांच्याशी चर्चा केली आणि आपला मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT