Pune, 27 December : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रिपद घ्यावं, कारण गेल्या पाच वर्षांत बीडमध्ये काय काय उद्योग झाले आहेत. बीड जिल्ह्यात त्यांच्याच पक्षात काय काय झालं आहे. कशामुळे या घटना घडल्या आहेत. अंधारातून कोण काय काय करतंय, त्यांना किती प्रकरणात अंधारात ठेवले आहे. बीडमधील या सर्व गोष्टींचा उलगडा करायचा असेल तर अजितदादांनी बीडचं पालकमंत्री व्हावं, अशी माझी आग्रहाची भूमिका आहे, असे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले.
खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) म्हणाले, बीडचे पालकमंत्रिपद हा माझा किंवा माझ्या पक्षाचा विषय नाही. सत्तेतील तीनही पक्षाने पालकमंत्रिपदाबाबत ठरवलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे नाव पालकमंत्रिपदाबाबत चर्चिली जात आहे. पण, मुंडे हे याअगोदर पालकमंत्रिपदी होते. त्यांच्या काळातच बीडची कायदा सुव्यवस्था बिघडली, त्यामुळे संतोष देशमुख खून प्रकरणाचा खरंच तपास करायचा असेल तर मुंडेंकडे पालकमंत्रिपद देण्याचे कोणतेही कारण नाही. घ्यावे की न घ्यावे हा त्यांचा विषय आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहविभाग आहे. त्यांनी आश्वासन देऊन आठ दिवस झाले तरी काही होत नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीडचे पालकमंत्रिपद घ्यावं, असं माझं म्हणणं आहे. अजितदादांनाही कळलं की बीड जिल्ह्यात कशामुळे या घटना घडल्या आहेत. अजितदादांच्या पक्षाचे तीन आमदार जिल्ह्यात आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षाला बीडचे पालकमंत्रिपद मिळू शकतं. त्यामुळे अजितदादांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, अशी भूमिका सोनवणे यांनी मांडली.
खासदार म्हणाले, संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास पहिले दोन ते चार दिवस स्थानिक पोलिसांकडे होता. त्यानंतर संतोष देशमुख खून प्रकरण, तसेच खंडणी आणि ॲट्रोसिटीचा गुन्हाही सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेला आहे. तीनही गुन्हे एकमेकांशी लिंकिंग आहेत, असे वाटल्याने पोलिसांनी हे तीनही गुन्हे सीआयडीकडे वर्ग केलेले आहेत. या तीनही गुन्ह्यातील मास्टर माईंडला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
संतोष देशमुख खूनप्रकरणाचा लवकरात लवकर तपास लागला पाहिजे, त्या दृष्टीकोनातून कोणी सीआयडी किंवा कोणी एसआयटीची मागणी केली असेल. पण मी पहिल्या दिवसापासून सीबीआय चौकशीची मागणी करत आहे. गेली पाच वर्षांत बीड जिल्हा हा वेगळ्या ट्रॅकवर गेलेला आहे. बीडची मागील काही वर्षांचा इतिहास काढला तर आजच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देणारी ठरली की काय, अशी शंका येते, त्यामुळे सीआयडीकडे देण्यापेक्षा हा गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी सोनवणे यांनी केली.
बजरंग सोनवणे म्हणाले, बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढण्यामागे कोण आहे, हे ज्यावेळी समोर येईल, त्यावेळी सर्वांना कळेल की बीडच्या गुंडगिरीला कोण बळ देतंय ते. देशमुख खून प्रकरणात मी कुणाचं नाव घेण्यापेक्षा, सर्व महाराष्ट्राला याबाबतच्या घटना माहिती आहेत. मागील पाच वर्षांत बीड जिल्ह्यात ज्या घटना घडल्या आहेत, त्याचा कुठेही उहापोह झालेला नाही. ही घटना पहिली नाही तर यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. त्या घटना दबल्या आहेत. अंजली दमानिया यांनीही व्हिडिओ व्हायरल केले आहेत.
बीडमध्ये घडलेल्या घटनांना पाठबळ कोणाचे आहे, हे तपासाचे काम पोलिसांचे आहे. मी तपास यंत्रणेत नसल्यामुळे मी कोणाचेही नाव घेणार नाही. आतापर्यंत ज्यांची नावे पुढे आली आहेत, त्यांचे फोटो धनंजय मुंडेंसोबत दिसत आहेत. या प्रकरणातील खरा गुन्हेगार पकडायचा असेल तर त्यांचे सीडीआर काढावेत. सीडीआरमध्ये त्याचे कोणासोबत काय काय उद्योग आहेत, तो कोणाकोणाशी बोलला आहे, हे पुढे येईल. त्यात हा गुन्हेगार काय वृत्तीने वागला आहे, हे दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले.
सोनवणे यांनी सांगितले, बीडमध्ये मर्जीतील पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. मागील काळात सत्तेत कोण होतं. हे अधिकारी कोणी आणून बसवले आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्री म्हणतात आम्ही कोणाला सोडणार नाही; पण कोणाला पकडणारही नाही, असा टोलाही खासदार बजरंग सोनवणे यांनी लगावला. पोलिस अधिकाऱ्यांना आपल्या सोयीच्या ठिकाणी आणलं जातंय, हे कोणी करतंय तेही सर्वांना माहिती आहे.
हल्ला झाला नाही, असा एकही दिवस बीडमध्ये नसतो. संतोष देशमुख खून प्रकरणात कोणीही राजकारण करत नाही. बीड जिल्ह्यातील पाच आमदार या प्रकरणावर बोलत आहेत. मात्र त्यांचं म्हणणं ऐकलं जात नाही, असा दावाही खासदारांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.