नवनाथ इधाटे
Phumambri Assembly Constituency : विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि आता राजस्थानचे राज्यपाल असलेले हरिभाऊ बागडे यांनी प्रतिनिधित्व केलेल्या फुलंब्री मतदारसंघाच्या यंदाच्या निवडणुकीत देवगिरी सहकारी साखर कारखान्याचा मुद्दा प्रचंड गाजला. चौदा वर्षापासून बंद असलेल्या या कारखान्याचा वनवास आता तरी संपणार का? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. भाजपाच्या विद्यमान आमदार अनुराधा चव्हाण यांनी निवडणूक प्रचारात हा कारखाना आपण सुरू करणार, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता त्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.
अनुराधा चव्हाण (Anuradha Chavan) यांनी निवडून आल्यानंतर मतदारसंघातील देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी कारखाना सुरू करण्यासाठी सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनाच्या पूर्ततेच्या दृष्टीने पहिले पाऊल पडण्याची घटना समोर आली आहे. कारखान्यावर असलेले अवसायक काढून शासन नियुक्त प्रशासकीय मंडळ लवकरच नियुक्त होणार असल्याची माहिती आहे. दहा वर्ष आमदार राहिलेले काँग्रेसचे कल्याण काळे आणि त्यानंतर सलग दोन टर्म आमदार आणि विधानसभा अध्यक्ष पद भुषवलेल्या हरिभाऊ बागडे यांना जमले नाही, ते पहिल्यांदाच निवडून आलेल्या महिला आमदाराने करून दाखवले, अशी चर्चा या निमित्ताने मतदारसंघात सुरू आहे.
फुलंब्री तालुक्याला गत वैभव प्राप्त करून देणारा देवगिरी सहकारी साखर कारखाना गेल्या 14 वर्षापासून बंद आहे. (BJP) परंतु आता कारखाना सुरू करण्यासाठी प्रशासकीय मंडळाच्या हालचालीला वेग आला आहे. कारखान्यावर असलेले अवसायक काढून शासन नियुक्त प्रशासकीय मंडळ लवकरच नियुक्त होणार आहे. फुलंब्री शहराच्या एक किलोमीटर अंतरावर उत्तर बाजूला असलेल्या देवगिरी सहकारी साखर कारखाना 1992- 93 मध्ये स्थापन झाला.
ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी देवगिरी सहकारी साखर कारखाना महत्त्वाचा मानला जात होता. शेतकर्यांना केंद्रबिंदु मानून अनेक शेतकर्यांना या कारखान्यावर रोजगार निर्माण झाला होता. तर उर्वरित शेतकर्यांनी ऊसाची लागवड करून तो कारखान्याला देत चांगला नफाही कमवला होता. परंतु कालांतराने या कारखान्यात राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे तो डबघाईस आला. 2010 - 11 मध्ये म्हणजे 14 वर्षांपूर्वी शेवटचा गळीत हंगाम झाला होता. त्यानंतर या कारखान्याला घरघर लागली.
कारखाना कर्जाच्या खाईत बुडाला. देवगिरी कारखान्याची मालमत्ता हर्सूल सावंगी, चौका व फुलंब्री कारखाना परिसर या तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती. यातील सावंगी परिसरामध्ये समृद्धी महामार्गात जमीन गेल्याने मोठा मोबदला कारखान्याला मिळाला. त्याचबरोबर चौका परिसरातील काही जमीन विकून कारखान्यावरील कर्ज कमी करण्यात आले. या भागाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी पूर्ण क्षमतेने पुढाकार घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरा सुरू केलेला आहे.
त्यामुळे आता हा कारखाना कर्जमुक्त होत आहे. परिणामी कारखान्यावर असणारा अवसायक काढून शासन नियुक्त प्रशासकीय मंडळ येण्याच्या हालचालीला वेग आला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी साखर आयुक्त अवसायक काढून देवगिरी कारखान्यावर शासन नियुक्त प्रशासकीय मंडळ नियुक्त करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्यानंतर या मतदारसंघातून अनुराधा चव्हाण यांना पक्षाने उमेदवारी दिली.
निवडणुक प्रचारात काँग्रेस महाविकास आघाडीकडून देवगिरी कारखाना सुरू करणार हे बाॅन्डवर लिहून द्या, असे आव्हान विरोधकांनी दिले होते. मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत देवगिरी कारखाना सुरू करण्याची मंजूरी आणा, असेही तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या सभेत आवाहन केले होते. भाजपाच्या अनुराधा चव्हाण यांनी काँग्रेस महाविकास आघाडीच्या विलास औताडे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत ही जागा जिंकली. तेव्हापासून देवगिरी कारखाना सुरू करून ऊस उत्पादकांना दिलासा देण्याचा चव्हाण यांचा प्रयत्न सुरू आहे. आता देवगिरी कारखान्याच्या प्रशासकीय मंडळात कोणाची वर्णी लागते? याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.