Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde : कृषिमंत्री मुंडेंचा शब्द खरा ठरला; शेतकऱ्यांना मिळाला ‘आनंदाचा मेसेज’ !

Maharashtra Farmers : दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यावर २०६ कोटी

Datta Deshmukh

Beed Political News : दिवाळीत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची २५ टक्के पीकविमा अग्रीम रक्कम मिळेल, हा राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा शब्द खरा ठरला आहे. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना मोबाईलवर तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले, असा ‘आनंदाचा मेसेज’ आला. जिल्ह्यातील सहा लाख ३४ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे सोमवारी २५ टक्के पीकविमा अग्रीमचे २०६ कोटी रुपये जमा झाले. (Latest Political News)

अग्रीम पीकविम्याची रक्कम एक हजार रुपयांपेक्षा कमी आहे, त्या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे किमान एक हजार रुपये याप्रमाणे रक्कम मिळावी, असा नियम आहे. त्यामुळे उर्वरित एक लाख ३४ हजार शेतकऱ्यांना ३५ कोटी रुपयांचे वाटपही लवकरच होणार आहे. यंदा खरीप हंगामाची सुरुवातच संकटात झाली. सुरुवातीला पावसाने ओढ दिली. याचा फटका सोयाबीन पीकालाही बसला. त्यामुळे खरिपातील सोयाबीनसह कपाशी, उडीद, मूग, आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.

सोयाबीन पिकाला २५ टक्के पीकविमा अग्रिम मंजूर व्हावा, या मागणीने जोर धरला. नव्यानेच सरकारमध्ये आलेल्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कृषिमंत्री झाले होते. शेतकऱ्यांना विमा मंजुरीत तांत्रिक अडचणी होत्या. यासाठी मुंडे यांनी कृषी विद्यापीठाची मदत घेतली. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या अहवालाचा आधार प्रस्तावाला जोडण्यात आला. यानंतर प्रधानमंत्री पीकविमा योजना जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी तीन अधिसुचनांद्वारे जिल्ह्यातील सर्वच ८६ महसूल मंडळांतील सोयाबीनला विमा अग्रिम मंजुरी दिली. याचा लाभ जिल्ह्यातील सात लाख ७० हजार शेतकऱ्यांना होणार होता.

या विरोधात कंपनीने सुरुवातीला विभागीय आयुक्त व नंतर राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीसमोर आव्हान दिले. मात्र, विमा कंपनीचे अपील फेटाळल्याने शेतकऱ्यांना विमा अग्रिम लागू करण्याशिवाय कंपनीकडे कुठलाही पर्याय राहिला नाही. दरम्यान, शेतकऱ्यांना दिवाळीत विमा अग्रिम रक्कम मिळावी, यासाठी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी राज्यातील विविध पीकविमा कंपनीचे अधिकारी व कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची विमा अग्रिम रक्कम मंजूर करावी, अशा सूचना दिल्या होत्या. (Maharashtra Political News)

दरम्यान, कंपनीने शासनाकडे महाडीबीटीमार्फत वितरणासाठी विमा अग्रिमची २४१ कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे जमा केली होती. मात्र, बँकांना सुट्या असल्याने मागील तीन दिवस ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. दिवाळीचा मुहूर्तही हुकतो की काय, अशी शंका निर्माण झाली होती. त्यातच सोमवारी सकाळपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर विमा अग्रिमची रक्कम जमा झाल्याचे मेसेज धडकले. आतापर्यंत सहा लाख ३४ हजार शेतकऱ्यांना २०६ कोटी रुपये वितरीत झाल्याची माहिती आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT