Dhananjay Munde Pankaja Munde .jpg Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde News: अनेक संकटांना तोंड देत परळी नगरपालिका जिंकली; धनंजय मुंडेंचा काॅन्फिडन्सच वाढला

Parli Election Results : गेल्या वर्षभरापासून राजकारणातील अनेक संकटांना तोंड देत वाटचाल करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांनी मतदारांचे आभार मानले आहे.

Jagdish Pansare

Parli News : गेल्या वर्षभरापासून राजकारणातील अनेक संकटांना तोंड देत वाटचाल करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांनी मतदारांचे आभार मानले आहे. परळी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि महायुतीचा विजय झाल्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी परळीकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

परळीच्या माय-बाप जनतेचे सहृदयी अनेक अनेक आभार! परळी वैद्यनाथ नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह युतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी केल्याबद्दल सर्व जनतेचे आभार.

मागील काही काळात परळीच्या मातीला आणि मातीतल्या माणसाला राजकीय द्वेषातून बदनाम केलेल्या सर्वांनाच इथल्या जनतेने मतांमधून चोख प्रत्युत्तर दिले आहे, याचा मनस्वी आनंद व अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.

या निवडणुकीत माझ्या परळीकरांना दिलेला प्रत्येक शब्द आठवून तो पूर्ण करण्याचे अभिवचन पुन्हा एकदा देतो, असे म्हणत या निवडणुकीसाठी पाठबळ दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे, स्वतःची निवडणूक समजून काम करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांचेही धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत.

परळीतच झाली महायुती..

नगरपालिका, नगरपंचयात निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने धनंजय मुंडे यांना धक्का दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख या मुंडेंच्या जवळ्या मोहऱ्याला फोडत परळी नगरपरिषदेच्या मैदानात उतरवले होते. निवडणुक प्रचारात, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणी पर्यंत दिपक देशमुख, राजाभाऊ फड या शरद पवाराच्या पक्षातील नेत्यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले होते. अगदी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राॅग रुमसमोर मुक्कामाची व्यवस्था करा म्हणत गोंधळही घातला होता.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी मंत्री पकंजा मुंडे, रिपाइं पक्षाला सोबत घेत राज्यातील पहिली महायुती परळीत केली. त्यांची ही खेळी अखेर यशस्वी ठरली. जवळपास सर्वच जागा या महायुतीने जिंकल्या आहेत. काही अपक्ष निवडून आले असले तरी ते महायुतीचेच असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. एकूणच परळी नगरपरिषदेतील विजयामुळे धनंजय मुंडे यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढल्याचे दिसून आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT