Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या पल्लवित झालेल्या आशेवर पाणी; पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील 'ती' कृती भोवणार?

Dhananjay Munde Political Crisis : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यात प्रश्न विचारण्यापासून माध्यमांना रोखण्याचा आमदार धनंजय मुंडे यांनी केलेला प्रयत्न आता त्यांच्या अंगलट येताना दिसत आहे.

Jagdish Pansare

Beed News : माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धनंजय मुंडे हे गेल्या दीड-दोन वर्षांपासून राजकीय संघर्ष करताना दिसत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचा सहभाग, या गोष्टी धनंजय मुंडे यांना माजी मंत्री करणाऱ्या ठरल्या.

त्यांना मंत्रिपद गमवावे लागले, मध्यंतरी प्रकृतीही बिघडली, विरोधक प्रबळ झाले. या सगळ्या राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेल्या धनंजय मुंडे यांना नशिबाची साथ काही मिळत नाहीये. दिवंगत अजित पवारांसारखा पाठीराखा गेला, पक्षाचे जिल्ह्यातील सगळे नेते एका बाजूला आणि धनंजय मुंडे एका बाजूला, अशी सध्याची परिस्थिती आहे.

आता मीडिया ट्रायलचे आरोप, जातीयवाद वाढल्यामुळे राजकारण सोडावे वाटते, ही जाहीर केलेली उद्विग्नता, यातून धनंजय मुंडे यांनी होती नव्हती, ती सहानुभूतीही गमावली की काय, असा प्रश्न अनेकांना पडताना दिसत आहे.

एकीकडे उद्विग्नता, तर दुसरीकडे पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दोन दिवसांच्या बीड दौऱ्यात नव्या जोमाने मैदानात उतरलेले, पुढील काळ आपलाच असेल म्हणणारे धनंजय मुंडे सगळ्यांनी पाहिले. पण राजकारणातील जातीयवादावर बोलताना त्यांनी व्यक्त केलेल्या उद्विग्नतेवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेला पलटवार, पंकजा मुंडे यांच्याबाबत घेतलेली मवाळ भूमिका धनंजय मुंडे यांच्यासाठी अडचणीची ठरू पाहत आहे.

सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यात प्रश्न विचारण्यापासून माध्यमांना रोखण्याचा मुंडे यांनी केलेला प्रयत्न त्यांच्या अंगलट येताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यावर प्रतिक्रिया देत मुंडे यांच्या अडचणीत भरच टाकली.

या सगळ्या घडामोडी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील वापसीसाठी घातक ठरू शकतात. येत्या एक-दोन महिन्यांत राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, फेरबदल होण्याची शक्यता आहे. अशावेळी धनंजय मुंडे यांच्याविरोधात उठलेले हे वादळ त्यांच्या मंत्रिपदाच्या आशा धुळीस मिळवण्याचे कारण ठरू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT