dharashiv parogram  Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv BJP internal controversy : भाजप आमदाराला घरचा आहेर! धाराशिवच्या राजकारणात मोठा खेळ; सत्कार कार्यक्रमाला ओम राजेनिंबाळकरांची प्रमुख उपस्थिती तर राणा पाटलांना डावलले

Dharashiv BJP banner controversy News : धाराशिव भाजपमधील अंतर्गत बंडाळी उघड झाली असून सत्कार कार्यक्रमाला खासदार ओम राजेनिंबाळकरांची प्रमुख उपस्थिती तर आमदार राणा पाटलांना डावलल्याने येत्या काळात या दोन गटातील वाद आणखी शिगेला पोहचण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

Dharashiv News : धाराशिव जिल्हा भाजपमध्ये गेल्या काही दिवसापासून सुरु असलेला सुप्त संघर्ष रविवारी विधान परिषदेचे नूतन आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने पुढे आला आहे. धाराशिव भाजपमधील दोन गटातील वादामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील विरुद्ध भाजपची निष्ठावंत मंडळी असे दोन गट पडले आहेत. या वादातूनच धाराशिव भाजपमधील अंतर्गत बंडाळी उघड झाली असून सत्कार कार्यक्रमाला खासदार ओम राजेनिंबाळकरांची प्रमुख उपस्थिती तर आमदार राणा पाटलांना डावलल्याने येत्या काळात या दोन गटातील वाद आणखी शिगेला पोहचण्याची शक्यता आहे.

धाराशिव भाजपमधील दोन गटात गेल्या अनेक दिवसापासून अंतर्गत संघर्ष सुरु आहे. मात्र, आतापर्यंत ही गटबाजी समोर आलेली नव्हती. मात्र, गेल्या आठ दिवसापूर्वी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे धाराशिव दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भाजपमधील काही निष्ठावंत नेत्यांना मंत्री गोरे यांची भेट घेऊ दिला नसल्याचा आरोप या मंडळीने केला होता. त्यानंतर या दोन गटातील वादाला खऱ्याअर्थाने तोंड फुटले होते.

या दोन गटातील वाद खऱ्या अर्थाने पहिल्यांदा सोशल मीडियावर रंगला होता. याठिकाणी नेतेमंडळी एकेमकावर आरोप-प्रत्यारोप करताना दिसले. मात्र, त्यावर भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी नेत्यांना सल्ला देत वाद मिटवण्याचा प्रयत्नही केला. मतभेद असू शकतात, मात्र ते पक्षाच्या योग्य व्यासपीठावर मांडावेत. प्रसार माध्यम अथवा सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणे टाळावे. संघटनेची शिस्त व पक्षाची प्रतिमा व कार्यकर्त्यांचा सन्मान जपणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिस्तीतूनच मजबूत संघटना आणि सक्षम नेतृत्व घडते, असा सल्ला त्यांनी फेसबुक पेजवर पोस्ट करीत पक्षातील नेत्यांना दिला होता. त्यामुळे या वादावर पडदा पडणार का? असे वाटत होते.

दुसरीकडे भाजपच्या निष्ठावंत गटाचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव गुंड यांनी रविवारी विधानपरिषदेचे नूतन आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या स्वागत पत्रिका आणि अधिकृत बॅनरवरून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव वगळले होते. त्याचवेळी दोन गटातील नाराजीनाट्य समोर आले होते.

त्यातच रविवारी पार पडलेल्या या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रमास व्यासपिठावर खासदार ओम राजेनिंबाळकरांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते भाजपचे आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तर यावेळी आमदार राणा पाटलांना डावलत घरचा आहेर दिला.

या सत्कार कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना व्यंकटराव गुंड यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राणा पाटील यांना जनसंघ काळापासून पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या जुन्या भाजप कार्यकर्त्यांची ऍलर्जी झाली आहे. आमदार पाटील जुन्या आणि निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांना टाळतात. त्यामुळे आम्हीही त्यांना टाळत आहोत. जिल्हा परिषद निवडणुकीत हेतुपुरस्सर उमेदवारी नाकारल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. पक्षातील सर्व घडामोडींविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या कानावर घातली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही भाजपचे काम निष्ठेने करीत आहोत आणि भाजपमध्येच राहणार आहोत. मात्र आमच्या मनातील नाराजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ नेत्यांना सांगितली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या काळात या दोन गटातील वाद रंगण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT