Dharashiv News : धाराशिव भाजपमधील दोन गटात सुरु असलेला अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे धाराशिव दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भाजपमधील काही निष्ठावंत नेत्यांना मंत्री गोरे यांची भेट घेऊ दिला नसल्याचा आरोप या मंडळीने केला होता. त्यानंतर या दोन गटातील वादाला खऱ्याअर्थाने तोंड फुटले होते. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील निष्ठावंत नेत्यांनी भाजप हायकमांडपर्यंत या सर्व तक्रारी पोहचवल्या होत्या.
त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी मतभेद असू शकतात, मात्र ते पक्षाच्या योग्य व्यासपीठावर मांडावेत. प्रसार माध्यम अथवा सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणे टाळावे. संघटनेची शिस्त व पक्षाची प्रतिमा व कार्यकर्त्यांचा सन्मान जपणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिस्तीतूनच मजबूत संघटना आणि सक्षम नेतृत्व घडते, असा सल्ला त्यांनी फेसबुक पेजवर पोस्ट करीत पक्षातील नेत्यांना दिला होता. त्यामुळे या वादावर पडदा पडणार का? असे वाटत असतानाच रविवारी विधानपरिषदेचे नूतन आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्यावरून पक्षातील मतभेद उघड झाले. या कार्यक्रमाच्या स्वागत पत्रिका आणि अधिकृत बॅनरवरून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे या दोन गटात जोरदार जुंपल्याचे दिसत आहे.
धाराशिवमध्ये आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमातून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव वगळण्यात आल्याचा आरोप त्यांच्या निकटवर्तीयांनी केला. तर दुसरीकडे नुकतेच महायुतीत सहभागी झालेले धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती ठेवण्यात आली होती. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत राजकारणाची चर्चा अधिक रंगली आहे.
या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजक व भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव गुंड यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राणा पाटील यांना जनसंघ काळापासून पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या जुन्या भाजप कार्यकर्त्यांची ऍलर्जी झाली आहे. आमदार पाटील जुन्या आणि निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांना टाळतात. त्यामुळे आम्हीही त्यांना टाळत आहोत. जिल्हा परिषद निवडणुकीत हेतुपुरस्सर उमेदवारी नाकारल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.
धाराशिव जिल्ह्यातील भाजपचे नेते या सर्व प्रकारावरून नाराज आहेत. या पक्षातील सर्व घडामोडींविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या कानावर घातली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही भाजपचे काम निष्ठेने करीत आहोत आणि भाजपमध्येच राहणार आहोत. मात्र आमच्या मनातील नाराजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ नेत्यांना सांगितली असल्याचे यावेळी व्यंकटराव गुंड यांनी सांगितले.
पक्षाध्यक्षांना डावलून राणा पाटील यांनी त्यांच्या पत्नीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. त्यामुळे येत्या काळात आमदार पाटील यांच्या विरोधातील खदखद पुढेही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही चुकीचे असू तर पक्ष आमच्यावर कारवाई करेल, असेही यावेळी व्यंकटराव गुंड म्हणाले.
या सर्व प्रकारानंतर गेल्या काही दिवसापासून सुरु असलेला सुप्त संघर्ष या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने पुढे आला आहे. धाराशिव भाजपमधील हा अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आमदार पाटील विरुद्ध भाजपची निष्ठावंत मंडळी असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता भाजपमधील या दोन गटातील वादावर हायकमांड कशा प्रकारे तोडगा काढणार व काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.