Dharshiv Bjp News : धाराशिव जिल्हा भाजप कार्यकारिणी निवडीला अखेर चार महिन्यांनंतर शनिवारी मुहूर्त लागला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील जिल्हा व शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जुलै महिन्यात जाहीर केल्या होत्या. धाराशिव जिल्हा भाजप अध्यक्षपदी संताजी चालुक्य यांची वर्णी लागली होती. मात्र, त्यानंतर जुना व नव्या गटाचा समन्वय साधण्याच्या प्रयत्नातून चार महिन्यांपासून कार्यकारिणी जाहीर केली नव्हती. या कार्यकारिणी निवडीला अखेर शनिवारी मुहूर्त सापडला.
धाराशिव जिल्हा कार्यकारिणी निवडीमध्ये निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने मोठी खदखद पाहावयास मिळत आहे. या कार्यकारिणी निवडीत जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची निवड करीत दोघांचा ताळमेळ घातल्याचे 'सरकारनामा'शी बोलताना जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी सांगितले.
४७ जणांची जम्बो कार्यकारिणी
जिल्हा कार्यकारिणीत १७ उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस, ११ चिटणीस व एक कोशाध्यक्ष, एक जिल्हा समन्वयक, नऊ तालुका अध्यक्ष अशी एकूण ४७ जणांची जम्बो कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.आमदार राणाजगजीतसिंह पाटलांचा मतदारसंघ असलेल्या तुळजापूर, धाराशिव तालुक्याचे कार्यकारणीवर मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसून येत आहे.
आमदार पाटील यांच्यासोबत प्रवेश करणाऱ्यांना संधी
तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे गावे असलेल्या अणदूरमधून दोघे, जळकोटमधून एक, नंदगाव येथील एकाचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. या चौघांपैकी तिघांनी आमदार पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये आमदार पाटील यांच्यासॊबत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या बऱ्याच जणांना संधी दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निवडीत नळदुर्गकडे दुर्लक्ष
विधानसभा निवडणुकीपूर्वी नळदुर्ग नगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक फोडून वर्चस्व असल्याचा दावा करणाऱ्या भाजपकडून कार्यकारणीत एकालाही संधी दिली नाही. भविष्यातील नगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या ठिकाणी एखादा तरी सदस्य कार्यकारणीवर घ्यायला हवा होता, अशी चर्चा आहे. मात्र कार्यकारणी निवडीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ( Maharashtra Politics )
भाजप निष्ठावंतांना डावलले
धाराशिव जिल्ह्यात माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, मिलिंद पाटील यांनी गेल्या १९८० पासून पक्षांची उभारणी करीत पडत्या काळात पाळेमुळे घट्ट रोवली. मात्र, आता भाजपची सत्ता आल्यानंतर या दोन्ही गटाला पहिल्यांदाच या वेळेस डावलल्याची चर्चा आहे. विशेषतः मिलिंद पाटील गटाच्या कोणाचाच कार्यकारिणीत समावेश नसल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नव्या चेहऱ्यांना संधी
धाराशिव जिल्हाध्यक्षपदी संताजी चालूक्य यांची निवड झाल्याने निष्ठावंतांना संधी दिली गेल्याची सर्वांची भावना होती. मात्र, कार्यकारिणी निवडीत मात्र आमदार पाटील गटाचे वर्चस्व असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. या निमित्ताने कार्यकारिणी निवडीत काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष विक्रम देशमुख, रामहरी शिंदे, अभय चालुक्य, विकास बारकुल सरोजनी राऊत, सुनील काकडे, दत्ता देऊळकर, बालाजी गावडे, सुरेश कवाडे, आदेश कोळी, सुदाम पाटील, सुखदेव टोम्पे, माधव पवार, मिनाज शेख, कैलास शिंदे, गोविंद कोकाटे व महादेव अखाडे या सतरा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सरचिटणीसपदी विकास कुलकर्णी, प्रदीप शिंदे, दीपक आलुरे व इंद्रजीत देवकते व माधुरी गरुड या पाच जणांची निवड करण्यात आली.
तालुका अध्यक्षपदी उमरगा : शहाजी पाटील, तुळजापूर : संतोष बोबडे, कळंब : अजित पिंगळे, लोहारा : शिवशंकर हातरगे, भूम : महादेव वडेकर, धाराशिव ग्रामीण : राजाभाऊ पाटील, परंडा : गणेश खरसडे, वाशी : राजगुरू कुकडे, धाराशिव शहर : अभय इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.