Congress Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Congress president : धाराशिव काँग्रेसचा 'कॅप्टन' कोण? 'भाकरी' फिरणार! जिल्हाध्यक्षपदासाठी 'या' तीन नेत्यांत जोरदार रस्सीखेच!

Maharashtra Congress politics News : धाराशिव जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या मंडळीकडून फॉर्म भरून घेण्यात आले आहेत. त्यामध्ये धाराशिव जिल्हा अध्यक्षपदासाठी एकूण 17 जण इच्छुक असल्याचे समोर आले आहे.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : धाराशिव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे. गेल्या आठवडाभरात काँग्रेसच्या 'संघटन सृजन' अभियानातील कामगिरीचा आढावा पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घेतला. त्या अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. त्यासोबतच धाराशिव जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या मंडळीकडून फॉर्म भरून घेण्यात आले आहेत. त्यामध्ये धाराशिव जिल्हा अध्यक्षपदासाठी एकूण 17 जण इच्छुक असल्याचे समोर आले आहे.

त्यामधील सहा जणांची नावे ही दिल्ली दरबारी हायकमांडकडे पाठवली जाणार आहेत. त्यापैकी एका नावावर या महिनाअखेरीस शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. त्यामध्ये सध्याचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणणारे नेते अशोक जगदाळे व जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झालेले युवा नेते महेश देशमुख यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. नुकत्याच जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निकालानंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होणार आहेत.

धाराशिव जिल्हा काँग्रेस (Congress) कमिटीच्या अध्यक्षपदासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असून, पक्षांतर्गत गटबाजी आणि नवीन नेतृत्वाच्या मागणीमुळे या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसचे नेतृत्व सक्षम करण्यासाठी नवीन चेहऱ्याची चाचपणी सुरू आहे. विशेषतः काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद गेल्या 26 वर्षांपासून एकाच कुटुंबाकडे आहे. त्यामुळे संघटनेत काहीशी मरगळ दिसून येत आहे. त्यामुळेच पक्षाला नवचैतन्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसकडून पावले उचलली जात आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून 11 ते 15 एप्रिल दरम्यान धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसच्या 'संघटन सृजन' अभियानातील कामगिरीचा आढावा पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घेतला. विशेषतः तालुकास्तरावर बैठका घेत त्यांची मते जाणून घेण्यात आली. एआयसीसी (AICC) नियुक्त निरीक्षकांमार्फत धाराशिव जिल्ह्यातील तालुका व जिल्हा पातळीवर आढावा घेऊन, नवीन नेतृत्वाची निवड महिनाअखेरीस केली जाणार आहे.

यात तरुणांना संधी, कार्यकर्त्यांचा कौल आणि सामाजिक समतोल राखण्यावर भर दिला जात आहे. हे निरीक्षक जिल्ह्यासाठी 6 नावांचे पॅनेल तयार करून वरिष्ठांकडे पाठवणार आहेत. धाराशिव जिल्हयात काँग्रेस निरीक्षक म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव राजेश तिवारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव हेमंत ओगले, महासचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, सचिव उदयसिंग पाटील यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

त्यामुळे येत्या काळात धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारिणीत लवकरच फेरबदल दिसणार आहेत. एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यातून अध्यक्षपदासाठी 17 जणांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, अशोक जगदाळे, युवा नेते महेश देशमुख, प्रशांत पाटील, महावीर बोंदर, धाराशिव बाजार समितीचे संचालक उमेशराजे निंबाळकर, विलास शाळू, महेबूब शेख, राजेंद्र शेरखाने, खलील सय्यद, माजी सभापती शिवाजी गायकवाड, हनुमंत पवार, धनंजय राऊत यांच्यासह जवळपास 17 जणांनी मुलाखती दिल्या आहेत.

स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि पक्षातील चर्चेनुसार, पुढील तीन नावे सध्या आघाडीवर असल्याचे संकेत मिळत आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत प्रभावशाली कामगिरी करणाऱ्या अशोक जगदाळे यांचे नाव यामध्ये आघाडीवर आहे. त्यांनी नळदुर्ग नगरपालिकेत 20 पैकी 9 नगरसेवक काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आणले आहेत. धाराशिव जिल्हयातील नळदुर्ग नगरपालिकेतच काँग्रेसचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाले आहेत. या ठिकाणी 'एमआयएम'चा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असल्याचा फटका काँग्रेसला झाला. अन्यथा, याठिकाणी निश्चितच काँग्रेसला पोषक वातावरण होते, त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठी त्यांची दावेदारी महत्वपूर्ण मानली जात आहे.

दुसरीकडे तरुण आणि संघटन कौशल्य असलेला चेहरा म्हणून उमरगा तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत कमी काळात चांगली कामगिरी करीत आपली छाप पाडली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. तर या पदासाठी सध्याचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, त्यांच्या कुटूंबाकडे अनेक वर्षांपासून जिल्हाध्यक्षपद असल्याने त्यांच्या ऐवजी नव्या नेत्याला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. या महिनाअखेरीस नव्या जिल्हाध्यक्षाच्या नावाची घोषणा होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT