Tanaji Sawant, Ranajagjitsinha Patil Sarkarnama
मराठवाडा

Shivsena Vs BJP : शिवसेनेला गृहीत धरू नका; धाराशिवच्या जागेवरून सावतांचा भाजपला इशारा

Dharashiv Constituency : राणाजगजितसिंह पाटीलांना तानाजी सावंताचे सडेतोड उत्तर

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : लोकसभेची निवडणूक वर्षभरावर आलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप-शिवसेनेत जागावाटपांवरून कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने लोकसभेच्या जागावाटपाबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी अनेक जागांवरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांसमोर ठाकल्याचे समोर आले. तीच स्थिती भाजप-शिवसेनेतही दिसून येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

धाराशिव लोकसभेची (Dharashiv) जागा युतीत कायम शिवसेनेकडे राहिली आहे. आता या जागेवर भाजपच्या वतीने दावा सांगितला जात आहे. भाजपच्या महाजनसंपर्क अभियानात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव लोकसभेची जागा भाजप लढेल, असा दावा केला आहे. त्यावर आरोग्य मंत्री तानाजी सांवत यांनी ही जागा कायम शिवसेनेकडे (शिंदे गट) आहे. त्यामुळे येथून शिवसेनाच लढेल. आम्हाला कुणीही गृहीत धरू नये, असा इशाराच दिला आहे. त्यामुळे धाराशिवच्या जागेवरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपचे वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्णाण झाली आहे.

भाजपच्या महाजनसंपर्क अभियानात आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajajitsingh Patil) यांनी धारशिव लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार लढेल, असे जाहीर केले. ते म्हणाले, "देशात २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. २०२४ मध्ये आपल्या हक्काचे मोदी सरकार स्थापन होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी या निवडणुकीत धाराशिवमधून भाजपच्या (BJP) हक्काचा उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे."

यावर शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी कसल्याही स्थितीत ही जागा शिवसेनाच लढणार असल्याचा दावा केला. सावंत म्हणाले, "ही मूळ जागा शिवसेनेची आहे. भाजपकडून याबाबत चूकून शब्द गेला असावा. २०१९ मध्ये शिवसेना २३ ठिकणी लढले. त्यातील १८ जागा निवडून आल्या आहेत. आताही आम्ही आमच्या २३ जागांवर ठाम आहोत. शिवसेना (Shivsena) निवडून आलेली किंवा पराभूत झालेली एकही जागा सोडणार नाही. उमेदवार पुढे ठरवू. ही जागा सोडण्याच प्रश्नच येत नाही. "

यावेळी कुणीही आम्हाला गृहीत धरू नये, असाही इशारा तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिली. सावंत म्हणाले,धाराशिवची जागा शिवसेनाच लढणार आहे. यात कुठलाही वाद किंवा मतमतांतर असण्याचे कारण नाही. भाजपने काय दावा केला हे आम्हाला माहीत नाही. मात्र आम्हाला कुणी गृहीत धरत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. आमचे अस्तित्व वेगळे आहे. शिवसेना हा वेगळा पक्ष आहे. ही जागा गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनाच लढवत आलेली आहे. त्यामुळे धाराशीवची जागा २०२४ मध्ये शिवसेनाच लढविणार आहे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT