Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात 2020 च्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. काढणीनंतर शेतात काढून ठेवलेले सोयाबीन पावसात भिजून दाण्यांना अक्षरशा मोड आले होते. पीकविमा कंपनीने नुकसानाची माहिती 72 तासांच्या आत दिली नाही, असे तांत्रिक कारण देत शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे दावे फेटाळले होते. यासाठी गेल्या सहा वर्षापासून न्यायालयीन लढा सुरू होता. अखेर या लढ्याला यश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शेतकऱ्यांना 226 कोटी रुपयांची पीकविमा नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा आधार होणार आहे.
भाजपचे (BJP) आमदार राणाजगजीतसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची माहिती देताना या सगळ्या लढ्याचा घटनाक्रमच सांगितला. सर्वोच्च न्यायालयाने आपली बाजू मान्य करीत 2020 ची नुकसान भरपाई देण्याचा जो निर्णय दिला आहे, त्याची माहिती आपल्याला सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. कारण आपल्या जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधवांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आणि संघर्षाला आता मोठे यश मिळाले आहे.
खरीप 2020 च्या सोयाबीन पीकविम्यापोटी आपल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुमारे 226 कोटी रुपयांच्या भरपाईचा मार्ग सर्वोच्च न्यायालयातील निर्णयामुळे मोकळा झाला आहे. ही केवळ 226 कोटी रुपयांची बातमी नाही. हा आपल्या शेतकऱ्यांच्या हक्काचा, न्यायाचा आणि त्यांच्या विश्वासाचा विजय आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल, 2020 मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आपल्या धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने सोयाबीन पिकवले होते. मात्र, काढणीनंतर शेतात ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी पावसात भिजल्या. दाण्यांना मोड आले. अनेक ठिकाणी सोयाबीन सडले. वर्षभराची मेहनत आणि शेतकरी बांधवांचे आर्थिक गणित अक्षरशः कोलमडले. अशा संकटाच्या काळात पीकविमा कंपनीने शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहणे अपेक्षित होते. मात्र, नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत दिली नाही, असे तांत्रिक कारण पुढे करून अनेक शेतकऱ्यांचे विमा दावे कंपनीकडून नाकारण्यात आले.
विचार करा, अतिवृष्टीमुळे संपर्क यंत्रणा विस्कळीत झाली होती. शेतकरी स्वतःचे नुकसान सावरण्याच्या प्रयत्नात होते. अशा वेळी 72 तासांच्या अटीचा आधार घेऊन त्याला विम्यापासून वंचित ठेवणे कितपत योग्य होते? आपण हा अन्याय मान्य केला नाही! शेतकरी बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे, ही भूमिका घेऊन हा विषय आपण सातत्याने लावून धरला. या लढ्याला न्यायालयीन पातळीवर नेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने शेतकरी बांधवांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. विमा कंपनीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही विमा कंपनीला दिलासा दिला नव्हता.
उर्वरित भरपाईसाठीही आपला पाठपुरावा सुरूच होता. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळेपर्यंत हा विषय सोडायचा नाही, ही आपली आग्रही भूमिका होती. आता या लढ्याला आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. सुमारे 226 कोटी रुपयांच्या भरपाईसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील ताज्या घडामोडीत शेतकरी बांधवांची बाजू मान्य झाली आहे. त्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत अनेकांनी संयम ठेवला. अनेक वर्षे प्रतीक्षा केली. आपल्या हक्कासाठी लढा दिला. त्या प्रत्येक शेतकरी बांधवांचे मी मनापासून अभिनंदन करतो. या प्रकरणात ज्यांनी कायदेशीर लढा दिला, सहकार्य केले, मार्गदर्शन केले, त्या सर्वांचेही मी आभार मानतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या भक्कम पाठबळाबद्दल त्यांचेही जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मनापासून धन्यवाद. माझ्यासाठी राजकारणापेक्षा शेतकरी बांधवांचे हित महत्त्वाचे आहे. त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, हीच माझी पहिली जबाबदारी आहे, असे म्हणत राणाजगजीतसिंह पाटील (Ranajagjitsinh Patil) यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगितली.
आजचा हा विजय म्हणजे एका दिवसाचा किंवा एका व्यक्तीचा विजय नाही. हा आपल्या धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि त्यांच्या न्याय्य हक्कासाठी केलेल्या संघर्षाचा विजय आहे. आता पुढील प्रक्रियेत ही रक्कम पात्र शेतकरी बांधवांपर्यंत लवकरात लवकर पोहोचावी, यासाठीही आपला पाठपुरावा सुरू राहील. शेवटी एवढेच सांगतो...शेतकरी बांधवांच्या घामाचा आणि कष्टाचा मोबदला मिळवून देण्यासाठी आपण सदैव आपल्या सोबत आहे. आपल्या सर्वांच्या विश्वास हीच माझी खरी ताकद आहे आणि शेतकरी बांधवांचे हित हेच माझे प्राधान्य असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.