

Sunil Kedar Resigns as Nashik BJP City President : नाशिक महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया आज पू्र्ण झाली. महापौर हिमगौरी आडके-आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत दहा स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत नियुक्ती घोषित करण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये भाजपचे सहा, तर शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटाच्या प्रत्येकी दोन स्वीकृत नगरसेवकांचा समावेश आहे.
दरम्यान नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून भाजपमध्ये असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाला विश्वासात न घेता स्वीकृत नगरसेवकांची नावे परस्पर निश्चित केल्याचा ठपका ठेवत नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा घेतला आहे. यासंदर्भात साम टीव्हीने वृत्त दिलं आहे.
केदार यांच्या राजीनाम्यामुळे नाशिक भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, या वृत्ताला पक्षाकडून अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. केदार यांच्याशी यासंदर्भात संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या वरीष्ठ पातळीवरुन सूचना असल्याचं सांगितलं. राजीनामा झाला किंवा नाही अशी विचारणा केली असता त्यांनी मी नियमित काम करत असल्याचं स्पष्ट केलं. राजीनाम्यासंदर्भात माझ्यापर्यंत अधिकृत माहिती नसल्याचं केदार यांनी स्पष्ट केल्याने संभ्रम वाढला आहे.
भाजपकडे नाशिक महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक असल्याने स्वीकृतच्या सर्वाधिक ६ जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. यात भाजपकडून अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, रामहरी संभेराव आणि चंद्रशेखर पंचाक्षरी या सहा जणांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, ही नावे परस्पर निश्चित केल्याचा आरोप ठेवत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुनील केदार यांचा राजीनामा घेत त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे साम टीव्हीचे वृत्त आहे. शहरभर या वृत्ताची चर्चा रंगली आहे.
भाजपमध्ये एकुण ३०० हुन अधिक इच्छुकांची संख्या होती. त्यातून सहा नावे कशी फायनल करणार यावरुन गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले होते. याचदरम्यान कॉंग्रेसच्या मदतीने भाजपने एक अतिरिक्त जागा देखील पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भाजपचा हा डाव फसला त्यातूनही अंतर्गत वाद अधिक चिघळल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, स्वीकृत नगरसेवक नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या भूमिकेबाबतही पक्षांतर्गत चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे महासभेत महापौरांनी नगरसेवकांची नावे अधिकृतपणे जाहीर झाली केली असतानाच, दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्याची माहिती समोर आली आहे.
नियुक्त स्वीकृत नगरसेवकांची यादी :
भाजप :
१. अजित चव्हाण
२. हेमंत धात्रक
३. संदीप लेनकर
४. रोहिणी नायडू
५. रामहरी सभेराव
६. चंद्रशेखर पंचाक्षरी
ठाकरे गटाची शिवसेना
१. हेमंत गायकवाड
२. बाबा गायकवाड
शिंदे गटाची शिवसेना
१. चंद्रकांत लवटे
२. बाबुराव आढाव
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.