Yedshi Diwali fire tragedy  Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Fire Tragedy : करंडे कुटुंबासाठी काळी दिवाळी! लक्ष्मीपूजनाच्या रात्री एकाच कुटुंबातील 6 जणांचा होरपळून मृत्यू

Dharashiv Diwali fire tragedy News : येडशी येथील एका किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर हे कुटुंब राहत होते. मध्यरात्री अचानक घराला आग लागली. काही वेळातच आगीने मोठे रूप धारण केले.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात दिवाळी सण साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. शिक्षणासाठी पुण्यात व धाराशिवमध्ये असलेल्या दोन मुली गावी आल्या होत्या. लक्ष्मीपूजनाच्या मध्यरात्री घराला अचानक आग लागली. या भीषण अग्नितांडवाने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहाही जणांचा गुदमरून मृत्यू झाला. तर एक जण या आगीतून बचावला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या उशिरा पोहोचल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

येडशी येथील एका किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर हे कुटुंब राहत होते. मध्यरात्री अचानक घराला आग लागली. काही वेळातच आगीने मोठे रूप धारण केले. घरात झोपलेल्या कुटुंबातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. धुरामुळे गुदमरून सहा जणांचा मृत्यू झाला. उत्तम त्रिंबक करंडे (वय 72) चंद्रकला उत्तम करंडे, (वय 65), गोविंद उत्तम करंडे,(वय 55) ज्योती गोविंद करंडे (वय 45), गायत्री करंडे, (वय 18), सिद्धी करंडे ( वय13) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. या घटनेतून एक व्यक्ती बचावल्याची माहिती आहे.

येडशी येथील गोविंद उत्तम करंडे यांच्या सिद्धी आणि गायत्री या दोन मुली शिक्षणासाठी बाहेरगावी राहत होत्या. एक मुलगी पुण्यात, तर दुसरी धाराशिवमध्ये शिक्षण घेत होती. दिवाळीचा सण असल्याने दोघीही आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करण्यासाठी गावी आल्या होत्या. मात्र, ज्या दिवाळीच्या आनंदासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते, त्याच दिवाळीत काळाने या कुटुंबावर घाला घातला.

या घटनेची प्रथम दर्शनीने दिलेल्या माहितीनुसार दुकानाच्या बाहेरच्या बाजूला सुरुवातीला आग लागली होती. त्यानंतर आगीचा विळख्याने घराचा बाहेर पडण्याचा दरवाजा ब्लॉक झाला. समोरच्या बाजूला आगीचा भडका एवढा होता की नारळाचे आणि पिंपळाचे झाड देखील शेंड्यापर्यंत जळाले. पहिल्या मजल्यावर झोपलेल्या दोघांचा जळून मृत्यू झाला. तर त्याच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या चौघांचा गुदमरून मृत्यू झाला. किराणा दुकान, कॉस्मेटिक दुकान आणि कपड्याचे दुकान या आगीत जळून खाक झाले. कॉस्मेटिकच्या धुरामध्ये विषारी धुर मिसळल्याने गुदमरून मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री आगीची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. मात्र, अग्निशमनची गाडी उशिरा पोहोचल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच गाडीमध्ये पुरेसे पाणी नव्हते आणि डिझेलचीही कमतरता होती. त्यामुळे गावकऱ्यांनी स्वतः डिझेल उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. अग्निशमन कर्मचाऱ्यांकडे आवश्यक सुरक्षा साहित्यही नव्हते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

अग्निशमन दल वेळेत पोहोचले असते, तर काहींचे प्राण वाचले असते, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त घरात लावलेल्या पणत्यांमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. धाराशिव शासकीय रुग्णालयात चार जणांना मृत अवस्थेत आणण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT