Dharashiv Lok Sabha constituency  Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Lok Sabha constituency : गोपीनाथ मुंडेंच्या तालमीत तयार झालेला नेता 'धाराशिव'च्या आखाड्यात; मै हूं ना..!

Dharashiv News : मोदी यांच्यासोबत असलेला फोटो समाजमाध्यमात डीपीला ठेवत मै हूं ना..! असा संदेशच त्यांनी दिला आहे.

Mangesh Mahale

-आनंद खर्डेकर

परंडा :आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार हे अद्याप महायुतीत निश्चित झालेले नसले तरी येथून लढण्यासाठी भाजपमधील इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या इच्छुकांची संख्या वाढतच आहे. माजी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरूळे, धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी पाटील यांनी आपली इच्छा पूर्वीच जाहीर केली आहे. यात आणखी एका नावाची भर पडली आहे. आता कै. गोपीनाथ मुंडे यांच्या मुशीत तयार झालेले विधान परिषदेचे माजी सदस्य सुजितसिंह ठाकूर यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली.

सुजितसिंह ठाकूर हे संघटनकौशल्यासाठी ओळखले जातात. पंकजा मुंडे यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचे यशस्वी नियोजन ठाकूर यांनीच केले होते. मध्यंतरी ठाकूर आजारी होते. आजारपणातून बाहेर पडल्यानंतर ते सक्रिय झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही ते निकटवर्तीय आहेत. पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यासोबत असलेला फोटो समाजमाध्यमात डीपीला ठेवत मै हूं ना..! असा संदेशच त्यांनी दिल्याची चर्चा समर्थक, कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ठाकूर यांनी प्रतिकूल काळात पक्षाचे काम जोमाने केले. युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशा महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी पक्षाने त्यांना दिली. राज्यातील पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतदेखील ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती नको अशी भूमिका घेणाऱ्यांमध्ये ठाकूर हेदेखील होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच फडणवीस यांचे विश्वासू बनलेल्या ठाकूर यांनी पक्षातील मातब्बरांना मागे टाकत विधान परिषदेची उमेदवारी मिळविली.

ठाकूर यांचा राजकीय आलेख चढताच राहिला. पक्षाला चांगले दिवस येऊ लागल्याने सर्वच पक्षातील मातब्बरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्याच्या राजकारणात तब्बल ५० वर्षे दबदबा राखणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यातल्या पक्षाच्या राजकारणाची सूत्रे विभागली गेली.

जिल्ह्यात पाटील अन् राज्यात ठाकूर अशी भूमिका अनेक कार्यकर्ते खासगीत बोलताना मांडत आहेत. यातच नव्याने झालेले जिल्हाप्रमुख संताजी चालुक्य हे औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांचे विश्वासू समजले जातात, ते ठाकूर यांचेही निकवर्तीय आहेत. कोणालाच न दुखावता राजकारण करण्याचे कौशल्य ठाकूर यांच्याकडे आहे. पंकजा मुंडे यांच्या नुकत्याच निघालेल्या शिवशक्ती परिक्रमेत महाराष्ट्राची वाघीण आली..! अशा घोषणा देणाऱ्या ठाकूर यांनी त्यानंतर काही दिवसांतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईत त्यांनी फडणवीसांच्या घरातील गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्यासोबतचा ठेवलेला डीपी मै हूं ना! असे सांगून जाणारा आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT