Santaji Chaluky, Omraje nimbalkar  Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Loksabha 2024 News : भाजप जिल्हाध्यक्षाचा खळबळजनक दावा; महाविकास आघाडी शोधतेय ओमराजेंना पर्याय ?

Political News : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीकडून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे महायुतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे.

Shital Waghmare

Dharashiv News : गेल्या वेळी निवडून आलेले खासदार निष्क्रीय अन् अर्धवटराव आहेत, हे जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे. म्हणून अजूनही महाविकास आघाडीने त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. ते नवा उमेदवार शोधत आहेत, असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीकडून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे महायुतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे.

उमेदवारी निश्चित असल्याने ओमराजे यांनी प्रचाराला सुरुवात केली असली तरी भाजपने मात्र त्यांच्यावर निष्क्रीयतेचा आरोप करत महाविकास आघाडी त्यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेत असल्याचा दावा केला आहे. केवळ पोकळ भाषणबाजीत माहीर असलेल्या अर्धवटरावांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळेच भांबावून गेलेला खासदार महायुतीकडे उमेदवार नाही, अशी थाप मारत सुटला आहे. खासदारांनी महायुतीची काळजी करत बसण्यापेक्षा स्वतःची उमेदवारी टिकवता येते का? ते पाहावे, असा टोलाही चालुक्य यांनी लगावला आहे. ( Dharashiv Loksabha 2024 News )

शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या प्रचार सभा, मेळाव्यातून महायुतीच्या नेत्यांवर टीका करणे सुरू केले आहे. महायुतीला धाराशिवमध्ये उमेदवारच मिळत नसल्याची टीका त्यांनी केली होती. याला भाजपचे जिल्हाध्यक्ष चालुक्य यांनी प्रसिद्धिपत्रक काढून प्रत्युत्तर दिले आहे. आपल्याला खासदारकीच्या पाच वर्षांत मतदारसंघात एकही ठळक काम करता आलेले नाही. मतदार आता जाहीरपणे जाब विचारत आहेत, त्यामुळे नैराश्याने ग्रासले गेलेले खासदार तोंडाला येईल ते बोलत सुटले आहेत.

गेली पाच वर्षे मन लावून भरीव विकासकामे केली असती तर निष्क्रीयपणाचा ठपका बसला नसता. आता पराभव समोर दिसत असल्याने महाविकास आघाडीवर सक्षम उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. स्वतःला उमेदवारी मिळण्याची खात्री नसल्याने निष्क्रीय खासदार मीच उमेदवार आहे हे भासवण्यासाठी मतदारसंघात दौरे करत सुटले आहेत, अशी टीका या पत्रकात करण्यात आली आहे. महायुतीला उमेदवार नाही अशी लोणकढी थाप मारत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. हे न करता त्यांनी स्वतःला उमेदवारी मिळते की नाही याची काळजी करावी, असा टोलाही चालुक्य यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या पाच वर्षांत यांचे कर्तृत्व काय? राज्यात यांची सत्ता होती. यांचे नेते मुख्यमंत्री होते, तेव्हा धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने ५०% हिस्सा भरावा, यासाठी कधी तोंड उघडले का ? परिणामी प्रकल्प रखडला. जर ठाकरे सरकारकडून त्यांनी एवढी बाब करून घेतली असती तर आतापर्यंत तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर दिसले असते. पण हे पहिला टप्पा पूर्ण झाल्याचे श्रेय घेण्यासाठी धडपड करत आहेत.

नरेंद्र मोदींजींच्या (Narendra Modi) लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन आपण खासदार झालात हे विसरू नका. आता तुम्हाला पाडण्यासाठी सक्षम उमेदवाराची गरज नाही तर आमचा साधा कार्यकर्ताही तुमचा पराभव करण्यासाठी पुरेसा आहे. एक फुकटचा सल्ला देतो स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी माझ्या विरोधात सक्षम उमेदवार नाही, अशी थाप मारण्याऐवजी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळते का याची चिंता करा.

धाराशिव मतदारसंघात महाविकास आघाडीने (MVA) जे सर्व्हे केले, त्यात खासदारांच्या निष्क्रीयतेचा फटका बसणार असल्याचे लक्षात आल्याने महाविकास आघाडी नवा सक्षम उमेदवार शोधत आहे, असा दावाही चालुक्य यांनी पत्रकात केला आहे.

R

SCROLL FOR NEXT