Chhatrapati Sambhajinagar News : जिथे सत्ता तिथे मी, मी असं अभिमानाने सांगणारे राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार सध्या कुठे आहेत? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. निवडणूक मग ती दिल्लीची असो, की गल्लीची सत्तार यांचा त्यात सहभाग असतोच. परंतु, लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून मी लढण्यास इच्छुक असल्याचे सांगणारे अब्दुल सत्तार महायुतीच्या जागावाटपाच्या घडामोडीपासून अलिप्त कसे? याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये असताना सत्तार यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार सुभाष झांबड यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावले होते. काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत त्यांनी झांबड यांच्याविरोधात एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना मदत केली. सत्तार यांनीच याचा उलगडा शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अनेकदा केला होता. परंतु, सध्या ते लोकसभा निवडणुकीच्या सगळ्याच घडामोडींपासून अंतर राखून आहेत. त्यांचे हे अंतर राखणे येणाऱ्या धोक्याची सूचना तर नाही ना? अशी शंकाही उपस्थितीत केली जाते.
अब्दुल सत्तार हे एक महत्त्वाकांक्षी आणि मनासारखे घडले नाही, तर बंड करणारे राजकीय नेते म्हणून परिचित आहेत. अगदी विधानसभा, लोकसभा असो की जिल्हा बॅंक, दूध संघ, सोसायट्या, कारखान्याची निवडणूक अशा सगळ्याच प्रक्रियेत अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा रोल असतोच. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश करत ते सिल्लोड मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झाले.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता. पण राज्यात युतीऐवजी महाविकास आघाडीचे सरकार आले आणि सत्तारांची बोळवण राज्यमंत्रिपदावर झाली. तेव्हापासून सत्तार नाराज होते. पण योग्य संधीची कायम वाट पाहात संयम बाळगणाऱ्या सत्तारांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडाची संधी मिळाली आणि त्यांनी अडीच वर्षांतच उद्धव ठाकरेंची साथ सोडली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिंदे यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळात सत्तार यांना कॅबिनेटपदी बढती आणि कृषी खाते मिळाले. पण कायम वादात आणि गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागानंतर सत्तारांचे कृषी मंत्रिपद काढून घेण्यात आले. तेव्हापासून त्यांच्याकडे अल्पसंख्याक विकास आणि पणन खात्याचा कारभार आहे. अर्थात हा बदलही त्यांनी नाराजीतूनच स्वीकारला होता. लोकसभेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत सत्तारांचे लांब लांब राहणे भविष्यातील धोक्याची घंटा तर नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आपला प्रासंगिक करार आहे, असे सांगणारे अब्दुल सत्तार लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या आधी हा करार पुढे कायम ठेवतात? की मोडतात? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विद्यमान 13 खासदारांना परत उमेदवारी मिळवून देण्यासाठी बैठकांवर बैठका घेत आहेत. अशावेळी शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट, मंत्री संदीपान भुमरे हे सातत्याने माध्यमांकडे विविध दावे करताना दिसत आहेत. पण जिल्ह्यातील दुसरे मंत्री अब्दुल सत्तार मात्र चुप्पी साधून आहेत. त्यांच्या या खामोशीचा अर्थ लवकरच उलगडेल, असेही बोलले जाते.
(Edited By Deepak Kulkarni)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.