Lok Sabha Election 2024 : धाराशिवमध्ये महायुती हतबल की ओमराजेंना गाफील ठेवण्याचा प्रयत्न?

Dharashiv Political News : उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तिन्हा पक्षांनी दावा केला आहे. असे असले तरी हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असला तरी राज्यातील अनेक मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत. उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघाच्या बाबतीतही असेच झाले आहे. या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचे घोडे अडले आहेत. महायुतीकडे किमान अर्धा डझन मातब्बर इच्छुक असतानाही ही जागा कोणाला सोडावी, याचा निर्णय झालेला नाही, दुसरीकडे, महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. महायुती हतबल आहे की खासदार राजेनिंबाळकर यांना गाफील ठेवून धक्कातंत्र वापरणार आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (Latets Marathi News)

उस्मानाबाद मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे. तिन्ही पक्षांच्या इच्छुकांनी उमेदवारीसाठी जोर लावला आहे. विद्यमान खासदार शिवसेनेचे असल्याने शिंदे गटाने या जागेवर दावा केला आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली होती. त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे. उस्मानाबादसह सोलापूर आणि लातूर जिल्ह्यात हा मतदारसंघ विस्तारलेला आहे. त्यामुळे उमेदवाराच्या पाठिशी मोठी यंत्रणा गरजेची असते. त्या अर्थाने ही जागा लढवण्यासाठी भाजपने हालचाली आधीच सुरू केल्या आहेत. भाजपकड़ून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव आघाडीवर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परदेशी यांच्यासह तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांचीही नावे आता चर्चेत येऊ लागली आहेत. याशिवाय भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील इच्छुक आहेत. नुकतेच काँग्रेसमधून भाजपवासी झालेले माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या दाव्यामुळे उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत आहे. महायुतीत या घडामोडी सुरू असताना खासदार राजेनिंबाळकर यांनी गावोगावी भेटी देऊन प्रचार सुरू केला आहे.

खासदार राजेनिंबाळकर यांनी नागरिकांशी नाळ जोडून घेतली आहे. कुणीही कॉल केला तर मी तो रिसिव्ह करतो, असा दावा ते करतात आणि लोकांकडूनही त्यांच्या या दाव्याची पुष्टी केली जात आहे. यामुळे ते तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. जाहीर सभांमध्ये ते या कॉलचे किस्से, गंमतीजमती सांगत असतात. खासदार आपला कॉल रिसिव्ह करतात, याचे लोकांना अप्रूप वाटत आहे. मी लोकांचे कॉल रिसिव्ह करतो, हे नॅरेटिव्ह खासदार राजेनिंबाळकर यांनी तयार केले आहे. विरोधकांकडे सध्यातरी त्याच्यावर तोड दिसत नाही. खासदार राजेनिंबाळकर यांनी पाच वर्षांत मतदारसंघासाठी केंद्रातून कोणत्या योजना आणल्या, किती विकासकामे केली, असे प्रश्न महायुतीच्या नेत्यांकडून विचारले जात आहेत. त्याचेही उत्तर राजेनिंबाळकर हे आता गावोगावीच्या सभांमधून देत आहेत.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : दुसऱ्यांकडे पक्ष गहाण ठेवायची ही राज ठाकरेंंची जुनीच पद्धत; राऊतांची बोचरी टीका!

शिवसेनेत फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे, याची जाणीव महायुतीला आहे. शिवाय, उस्मानाबाद मतदारसंघात महाविकास आघाडीकडे मातब्बर नेते राहिलेले नाहीत. खासदार ओम राजेनिंबाळकर आणि धाराशिवचे आमदार केलास पाटील, भूम-परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे असे मोजकेच चेहरे आहेत. याउलट महायुतीकडे दिग्गज नेत्यांची रांग आहे. इतके सगळे दिग्गज आणि त्यांच्यासमोर खासदार राजेनिंबाळकर, असे चित्रही येत्या काही दिवसांत दिसणार आहे. त्यामुळे राजेनिंबाळकर यांनाही सहानुभूती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायाने महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याची डोकेदुखी वाढू शकते.

Lok Sabha Election 2024
Sunil Tatkare On NCP Crisis : 'अटी-शर्थींसह 'घड्याळ' वापरणार का?' कोर्टाच्या निर्णयावर तटकरे म्हणाले....

एकेकाळी कट्टर राजकीय विरोधक असलेले नेते आता महायुतीत आहेत. ते एकदिलाने काम करणार किंवा नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. खासदार राजेनिंबाळकर यांना मी खासदार केले, असे वारंवार सांगून पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Savant) यांनी गेल्या निवडणुकीत तत्कालीन खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी आपणच कापली होती, हे स्पष्ट करून टाकले आहे. माजी राज्यमंत्री बसवराज पाटील हे आता भाजपमध्ये आहेत. बसवराज पाटील यांना टक्कर देण्यासाठी काही वर्षांपूर्वी उमरगा-लोहारा विकास आघाडी स्थापन करण्यात आली होती. या आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा समावेश होता. आता हे सर्वजण महायुतीत आहेत. ते एकदिलाने काम करणार की त्यांचे अंतर्विरोध डोके वर काढणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

खासदार राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना महायुतीच्या ताकदीचा अंदाज आहे. लवकर उमेदवार जाहीर न करणे हा महायुतीच्या डावपेचांचा, आपल्याला गाफील ठेवण्याचा भाग असू शकतो, याची त्यांना जाणीव आहे. महायुतीला माझ्याविरोधात उमेदवार मिळत नाही, अशी टीका ते करत असले तरी ते गाफील नाहीत. त्यामुळे त्यांनी प्रचार सुरू केला आहे. ते गावोगावी भेटी देत आहेत. पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत आहेत. महायुतीचा उमेदवार जाहीर होईपर्यंत मतदारसंघातील बहुतांश भागांत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महायुतीकडे एकापेक्षा एक दिग्गज नेते आहेत. त्यांचा सामना खासदार राजेनिंबाळकर कसा करणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मी सर्वांचे कॉल रिसिव्ह करतो, हे खासदार राजेनिंबाळकर यांचे नॅरेटिव्ह खोलवर रुजलेले आहे. त्याचा सामना करण्यासाठी महायुतीला कसरत करावी लागणार, हेही तितकेच खरे आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com