Dharashiv-Solapur railway  Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv-Solapur Railway : धाराशिव-सोलापूर लोहमार्ग भूसंपादनाचा वाद पेटला; राणाजगजितसिंह पाटील कोर्टात जाणार

Ranajgajitsinh Patil News ; धाराशिव-सोलापूर लोहमार्ग भूसंपादन आणि मोबदल्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली हेाती. त्यात शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

सरकारनांमा ब्यूरो

शितल वाघमारे

Dharashiv News : धाराशिव-तुळजापूर-सोलापूर लोहमार्गाच्या भूसंपादनामुळे शेतकरी आणि प्रशासनासोबतच राजकीय वाद सुरु झाला आहे. रेल्वे प्रशासन लोहमार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा भाव कमी देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जिल्हाधिकारी कार्यलयात शुक्रवारी (ता. 12 जानेवारी) झालेल्या बैठकीत हा वाद विकोपाला गेला. शेतकऱ्यांनी आपला रोष जिल्हाधिकारी यांच्या समोर व्यक्त केला. (Dharashiv-Solapur railway land acquisition controversy escalated)

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या लोहमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील 32 गावांतील 1 हजार 375 एकर जमीन या मार्गासाठी संपादित करण्यात येणार आहे. रेल्वे अधिनियमाप्रमाणे ग्रामीण भागातील जमिनीसाठी निर्धारित दराच्या चारपट, तर शहरी भागात दोनपट मोबदला दिला जातो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासगी वाटाघाटीने थेट खरेदी केल्यास 25 टक्के अधिक म्हणजे पाचपट रक्कम मिळते. मात्र, खासगी वाटाघाटीने संपादन केल्यास शेतमालकांना पुन्हा न्यायालयात वाढीव मोबदल्यासाठी मागणी करता येत नाही. तसेच, खासगी वाटाघाटीतही जिल्हाधिकारीच प्रचलित नियमाप्रमाणे दर निश्चिती करतात.

या बैठकीला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही बाधित शेतकऱ्यांच म्हणणं आहे की या प्रक्रियेत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक चुका केल्या आहेत. त्यामुळे अपेक्षित मोबदला मिळू शकत नाही. असे जाणूनबुजून करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. लवाद नेमून जमिनीला योग्य भाव द्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

धाराशिव -तुळजापूर- सोलापूर हा लोहमार्ग 30 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या मार्गावर सांजा,  वडगाव आणि तुळजापूर,  असे तीन नवीन  रेल्वे स्थानक उभारले जाणार आहेत. एकूण 84 किलोमीटर लांबीच्या या लोहमार्गावर 110 पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत. या  लोहमार्गाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी कामाचे तीन टप्पे करण्यात आले असून धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे करण्यात आले आहेत. 

भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, रेल्वेच्या भूसंपादनात खासगी वाटाघाटी करूनही बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणार नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार न्यायालयीन मार्ग अवलंबिण्याचा निर्णय आपण घेतला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील 32 गावांतील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आता थेट न्यायालयात जाणार आहोत. बाधित शेतकऱ्यांनी त्यासाठी संपर्क करावा, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT