Dharashiv News : धाराशिव झेडपीच्या निवडणुकीत महायुतीने एकत्रित बहुमत मिळवले होते. त्यानंतर सत्तास्थापन करताना भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अध्यक्षपदावरून मोठी रस्सीखेच पाहावयास मिळाली. मात्र, त्यानंतर मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने अध्यक्षपदावरील दावा कायम ठेवला. दोन्ही पक्षातील वाद मुंबई दरबारी पोहचला होता. मात्र, यामध्ये भाजपने बाजी मारली असून महायुतीमधील एकी कायम ठेवत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी धाराशिव झेडपीत भाजपचा पहिला अध्यक्ष बसवला.
भाजपच्या (BJP) अर्चना पाटील या पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या आहेत. त्याच वेळी दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांना उपाध्यक्ष झाल्या आहेत. अर्चना पाटील यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड होताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी जेसीबीतून फुले आणि गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विजयी जल्लोष करीत खासदार ओमराजे निंबाळकर यांना डिवचले.
जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येताच शुक्रवारी धाराशिव येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. महिनाभरापूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले होते. या निवडणुकीत जिल्हा परिषदेत जवळपास तीन पक्षाचे मिळून 40 पेक्षा अधिक सदस्य निवडून आणले तर दुसरीकडे जिल्ह्यातील आठ पंचायत समितीपैकी पाच ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सभापती झाले तर दुसरीकडे तीन ठिकाणी भाजपचे सभापती झाले.
शुक्रवारी झालेल्या झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत महायुतीने बाजी मारली. शुक्रवारी झालेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदी भाजपच्या अर्चना पाटील या विजयी झाल्या त्यांना 55 पैकी 45 इतके मतदान झाले. तर त्यांच्या विरोधातील उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या कांचनमाला सांगवे यांना 9 मते पडली तर काँग्रेसचा एक सदस्य गैरहजर राहिला. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या उषा गायकवाड यांना 55 पैकी 45 इतके मतदान झाले. तर विरोधातील काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांना दहा मते पडली. महायुतीचे दोन्ही उमेदवार होताच भाजप, शिवसेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील (Rana Patil ) यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी जेसीबीतून फुले आणि गुलालाची मुक्तपणे उधळण करण्यात आली. त्यासोबतच यावेळी 'नादी नको लागू बाळा...' या गाण्यावर मल्हार पाटलांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला. या विजयी जल्लोषातून खासदार ओमराजे निंबाळकर यांना त्यांनी डिवचले.
तीन महिन्यापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राणा जगजीतसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकविणार असल्याचा दावा केला होता. त्यांचा या केलेल्या दाव्याप्रमाणे निवडणुकीत विजय मिळवताच समर्थक कार्यकर्त्यासह धाराशिव शहरात मोठे शक्तीप्रदर्शन करीत एकच जल्लोष केला.
धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. जिल्ह्यातील नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळविल्यानंतर मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पुन्हा एकदा खासदार ओमराजे निंबाळकर यांना खुले चॅलेंज दिले आहे. विरोधकांचा बाजार उठला असून आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून येतील. नगर परिषद निकालानंतर मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना चॅलेंज दिले होते ते त्यांनी पुर्ण करून दाखविले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.