Dhiraj Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Dhiraj Deshmukh : लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख बिनविरोध, फूट पडलेल्या महायुतीला काँग्रेसचा पहिला धक्का?

Latur DCC Bank Election: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख यांचा अर्ज एकमेव वैध ठरल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. महायुतीतील मतभेदांमुळे राजकीय समीकरणे चर्चेत आली आहेत.

Jagdish Pansare

Latur DCC Bank News : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील काँग्रेसच्या तंबूत शिरल्याने भाजप नेत्यांचा तिळपापड झाला आहे. भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी थेट पक्षश्रेष्ठींकडे लेखी करणार असल्याचे सांगून टाकले. महायुतीचे मंत्री असलेल्या बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेसच्या माजी आमदाराच्या गाडीतून त्यांचा अर्ज भरण्यासाठी यावे, हे लाजीरवाणे असल्याची खोचक टीका निलंगेकर यांनी केली होती.

लातूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर वैध अर्जांची यादी समोर आली आहे. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या मार्केटिंग सोसायटी, कृषी औद्योगिक सहकारी संघ, प्रक्रिया सहकारी संस्था, सुतगिरणी, साखर कारखाने आणि बीज प्रक्रिया सहकारी संस्था या मतदारसंघातून त्यांचाच एकमेव अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून धीरज देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. आता निवडणूक प्रक्रियेतील औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे.

त्यामुळे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेसचे धीरज देशमुख हे बिनविरोध विजयी झाले आहेत. निवडणुकीचे प्रत्यक्ष मतदान होण्याआधीच काँग्रेसचे आधीच फूट पडलेल्या महायुतीच्या सहकार पॅनलला धक्का दिला आहे. लातूर जिल्हा बँकेवर गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेस व देशमुख कुटुंबाचे एकहाती वर्चस्व आहे. या वर्चस्वाला धक्का लावण्याचे भाजपाचे प्रयत्न वेळोवेळी फसले होते.

यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलावी, प्रशासक नेमावा अशी मागणी भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर व बँकेच्या काही संचालक, सभासदांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती, परंतु कोर्टाने ही मागणी फेटाळली होती. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. काँग्रेस विरोधात महायुतीतील भाजपा-शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून सहकार पॅनल मैदानात उतरवण्याचे प्रयत्न सुरू होते.

परंतु सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी चाळीस वर्षापासून लातूर जिल्हा बँकेचा कारभार काँग्रेसच्या नेतृत्वाखाली उत्तम सुरू असल्याचे सांगत त्यांच्यासोबत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. पाटील यांचा हा निर्णय भाजपाच्या स्थानिक नेत्यांसाठी मोठा धक्का होता. त्यानंतर आता धीरज देशमुख यांनी बिनविरोध निवडीने युतीतील भाजप-राष्ट्रवादीला दुसरा धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT