Sanjay Shirsat Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat : पुन्हा मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरूवात अन् संजय शिरसाट..!

Maharashtra Cabinet Expansion : विरोधकांनी मात्र आमदारांना खूष करण्यासाठी मंत्रीमंडळ विस्ताराचे गाजर दाखवले जात आहे, असा टोमणा मारणं सुरू केलं आहे.

Jagdish Pansare

Sanjay Shirsat on Maharashtra Cabinet Expansionराज्यात झालेले सत्तांतर, मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि त्यानंतर गेल्या दोन-सव्वादोन वर्षांपासून सुरू असलेली विस्ताराची चर्चा याचा आता सगळ्याना उबग आला आहे. विशेषतः मंत्रिपदाची आशा बाळगून, कोट शिवून बसलेल्या शिंदे गटातील इच्छुक आमदारांची तर आता या प्रश्नावर काय बोलावे? अशी अडचण होऊ लागली आहे.

महायुती सरकारचे या कार्यकाळातील शेवटचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. सहाजिकच मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा आणि मुहूर्त पुन्हा सांगितले जाऊ लागले आहेत. तर विरोधकांनी मात्र आमदारांना खूष करण्यासाठी मंत्रीमंडळ विस्ताराचे गाजर दाखवले जात आहे, अशी टीका करत इच्छूकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट हे देखील मंत्रिपदासाठी इच्छूकांपैकी एक आहेत. गेल्या दीड-दोन वर्षात शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून मंत्रीमंडळ विस्तारावर संजय शिरसाट यांनी शेकडो वेळा माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आणि मुहूर्त सांगितले, पण ते सगळे फोल ठरले.

नुकत्याच झालेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संदीपान भुमरे(Sandipan Bhumre) निवडून आले आहेत. भुमरे दिल्लीला गेल्यामुळे त्यांच्याकडे असलेले मंत्रीपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आपल्याला मिळेल अशी, अपेक्षा संजय शिरसाट व त्यांचे समर्थक बाळगून आहेत. विधीमंडळ अधिवेशनापुर्वी मंत्रीमंडळ विस्तार होण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू होती, पण तसे काही घडले नाही.

पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस संपला तरी या विषयावर अद्याप चर्चा नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय म्हणजे सत्ताधारी पक्षातील अनेक इच्छूकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने विरोधक यावरून त्यांना टोले लगावण्याची एकही संधी सोडत नाहीत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांच्यासह सर्व विरोधकांनी मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदारांनी इकडून तिकडे उड्या मारू नयेत, म्हणून दाखवलेले गाजर असल्याचे म्हटले आहे. यावर विधानभवन परिसरात माध्यमांनी जेव्हा संजय शिरसाट यांना गाठले आणि मंत्रीमंडळ विस्तारावर प्रश्न विचारला तेव्हा मात्र त्यांचा चेहरा पडल्याचे दिसले.

विरोधकांकडून मंत्रींडळ विस्तार म्हणजे गाजर असल्याची टीका होत आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले तेव्हा शिरसाट(Sanjay Shirsat) चांगलेच भडकले. मंत्रीमंडळ विस्तार हा सत्ताधारी पक्षातील अंतर्गत विषय आहे. याच्याशी विरोधकांचा काय संबंध? त्यांना कोणी मंत्री करणार आहे का? मंत्रीमंडळ विस्तार जेव्हा करायचे तेव्हा मुख्यमंत्री करतील, तो त्यांचा अधिकार आहे? अशा शब्दात शिरसाट यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

मंत्रीमंडळ विस्तार म्हणजे आमदारांना दाखवलेले गाजर ही विरोधकांची टीका शिरसाट यांना चांगलीच झोंबल्याचे यातून दिसत आहे.तर विरोधकांनी या निमित्ताने शिरसाट यांची चांगलीच अडचण केल्याचे दिसून येत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT