Dr.Bhagwat Karad News Sarkarnama
मराठवाडा

Dr.Bhagwat Karad News : मंत्रिपद गेले म्हणून काय झाले? दिल्लीतून परतताच कराड कामाला लागले...

Chhatrapati Sambhajinagar Politics : दोन वर्ष अकरा महिने केंद्रात अर्थ खात्याचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातून कराड यांना वगळण्यात आले.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : राजकारणात पद, सत्ता गेली तरी खचून जायचे नसते हे वाक्य नेत्यांच्या तोंडून आपण नेहमीच ऐकत असतो. पण प्रत्यक्षात तसं वागणारी नेते, लोकप्रतिनिधी बोटावर मोजण्या इतके सापडतात.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात अनेक धक्कादायक निकाल लागले. यातून देश पातळीवर मोठे फेरबदल झाले आणि त्याचा फटका काही नेत्याना बसला. यापैकीच एक म्हणजे भाजपचे राज्यसभा खासदार माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Bhagwat Karad) हे होय...

दोन वर्ष अकरा महिने केंद्रात अर्थ खात्याचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातून कराड यांना वगळण्यात आले. संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यास इच्छूक असतांना जागा शिवसेनेला सोडण्यात आली. निवडणूक निकालानंतर देशभरात भाजपची (BJP) पिछेहाट झाल्यामुळे मित्र पक्षाच्या मदतीने सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये कराडांना मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले.

नुकताच त्यांनी दिल्लीत नव्या मंत्र्यांचे स्वागत करत अर्थमंत्रालयाचा निरोप घेतला. पण दिल्लीतून परतल्यानंतर कराड जिल्ह्यात पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले. मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाले आहे, शेतकरी पेरणीच्या तयारीला लागलेला आहे. अशावेळी भागवत कराड यांच्या पुढाकारातून कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत बियाणांचे वाटप करण्यात आले.

शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी कराड यांनी सांगितले. खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही खासदार डॉ.भागवत कराड यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले. कन्नड तालुक्यात अंधानेर, हातनूर व जेहुर या गावांमध्ये शेतकऱ्यांना कराड यांनी स्वत: बियाणे वाटप केले.

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे देऊन त्यांचे पिक व आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी माझा विशेष प्रयत्न यापुढे सुरूच राहील. शेतकरी समृद्ध व्हावा आणि शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत, सहकार्य करण्यासाठी यापुढील काळातही मी कटिबद्ध आहे, असे आश्वासन कराड यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी शेकडो अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले. कापूस, मका आणि बाजरी बियाणांचे एकत्रित किट तयार करण्यात आले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT