Sharad Pawar, uddhav thackeray  Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : आता शिंदेंचाच माजी आमदार म्हणतोय, ठाकरे-पवारांना सहानुभूती !

Sachin Waghmare

लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी सातव्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल्स समोर आले आहेत. पोल्सवर सध्या जोरात चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम देशात सात टप्पे, 43 दिवस रंगला. महायुती व महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीदरम्यान रात्रीचा दिवस करून मेहनत घेतली.

त्यानंतर एक्झिट पोल्समध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळत नसल्याने आता शिवसेना शिंदे गटातील माजी आमदार व शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी उद्धव ठाकरे- शरद पवारांना सहानुभूती होती, असे मत व्यक्त केले आहे. (Shivsena News)

शिवसेना शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यास उशीर केला. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे काही जणांना प्रचारासाठी वेळ मिळाला असे सांगत अर्जुन खोतकर यांनी राज्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी निवडणुकीत सहानुभूती होती. त्याची लाट निर्माण करण्यास ते यशस्वी झाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपने (Bjp) लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच 20 जागांवरील उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला. शिवसेना शिंदे गटाने जर सुरुवातीला लवकर उमेदवार जाहीर केले असते तर लोकसभा निवडणुकीत वेगळे चित्र दिसले असते, असे अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले.

महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठीआम्ही उतरल्यानंतर पेट्रोलची दरवाढ, शेतीमालाला भाव नाही या समस्येला सामोरे जावे लागले. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना दाम दुपटीचे आश्वासन दिले होते. मात्र ते पाळले न गेल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराज होती, असेही यावेळी अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले.

नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना नाहक गोष्टीत अडकून टाकण्यात आले. त्यामुळे त्यांना प्रचार करण्यासाठी व मतदार संघात फिरण्यासाठी वेळ मिळाला नाही. गोडसे यांचा अधिक वेळ भाजप -शिवसेनेच्या नेतृत्वाला मुंबईमध्ये भेटण्यामध्ये जात होता. त्यामुळे त्यांना मतदारसंघात फार काळ फिरता आले नसल्याचे खोतकर यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT