Eknath Shinde Ashok Chavan .jpg Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News: 'पाहुण्यानं नांदेडला काहीतरी देऊन जावं...'; शिंदेंच्या दौऱ्यावरुन अशोक चव्हाणांनी डिवचलं, शिवसेनेचाही करारा जवाब

Eknath Shinde Nanded Visit: नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांच्या वर्चस्वाला हादरा देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. माजी आमदार तथा शेतकरी संघटनेचे मराठवाड्यातील नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी आपल्या हजारो समर्थकांसह नुकताच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Jagdish Pansare

Shivsena-BJP News : नांदेडमध्ये कोणीही येऊ शकतं, आता चांगली विमानसेवा सुरू झाली आहे, पण पाहुण्यांनी यावे, त्यांचे स्वागतच आहे. पण जाताना नांदेडला काहीतरी देऊन जायला हवं, रिकाम्या हातानं जाऊ नये, असा खोचक टोला भाजपा नेते खासदार अशोक चव्हाण यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. दोन दिवसापूर्वी शिंदे हे लोहा येथे शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने आले होते.

या संदर्भात माध्यमांनी छेडले तेव्हा, अशोक चव्हाण यांनी नांदेडला येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत आहे, इथे कोणीही येऊ शकतं, नांदेडला चांगली विमानसेवा सुरू झाली आहे. पण पाहुण्यांनी जाताना काहीतरी देऊन जावं, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या घोषणेची अपेक्षा व्यक्त केली. यावर शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर पलटवार केला.

अशोक चव्हाण यांच्याकडे नांदेडची सत्ता आहे. गेली 72 वर्ष चव्हाण कुटुंबाकडे सत्ता असताना त्यांनी फक्त नांदेडसाठी आलेला निधी फस्त करण्याचे काम केले. त्यांच्याकडे असलेल्या टोळीने सर्व पैसा फस्त केला. नांदेडच्या कारभार्‍यांच मुख्य लक्ष फक्त टेंडर, गुत्तेदार आणि टक्केवारी वरच असल्याचा हल्लाबोल पाटील यांनी केला. एकनाथ शिंदे हे देणारे आहेत. तुम्ही त्यांच्याकडे काही मागितले असते, तर त्यांनी नक्कीच दिले असते, असा टोलाही हेमंत पाटील यांनी लगावला.

नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांच्या वर्चस्वाला हादरा देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. माजी आमदार तथा शेतकरी संघटनेचे मराठवाड्यातील नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी आपल्या हजारो समर्थकांसह नुकताच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाचा मोठा सोहळा आणि त्या निमित्ताने शेतकऱ्यांची ताकद मेळाव्याच्या माध्यमातून दाखवण्यात आली. यासाठी एकनाथ शिंदे मुंबईहून थेट नांदेडमध्ये आले होते.

शंकरअण्णा धोंडगे यांचा प्रवेश सोहळ्या आणि त्याला मिळालेला प्रतिसाद मोठा होता. धोंडगे यांच्या प्रवेशाने नांदेड जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढेल, अशी चर्चा आहे. अशोक चव्हाण यांच्या वर्चस्वाला शह देण्याचा कुठे तरी या माध्यमातून प्रयत्न असल्याचे बोलले जाते. अशोक चव्हाण यांनीही या नव्या राजकीय समीकरणाचा धक्का घेतल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होत आहे. एकनाथ शिंदे यांना पाहुणा संबोधून ते रिकाम्या हाताने परतल्याबद्दल चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.

नांदेडमध्ये कोणीही यावे, पाहुण्यांचे स्वागतच आहे, पण पाहुण्यांनी रिकाम्या हाताने जाऊ नये, तर या शहरासाठी काही तरी देऊन जावे, असा चिमटा अशोक चव्हाण यांनी काढला. यावर आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण आणि त्यांचे कंत्राटदार, गुत्तेदाराचे टोळके नांदेड विकायला निघालेत, अशी घणाघाती टीका केली.

एकनाथ शिंदे हे सर्वाधिक फायलींवर सह्या करणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे नांदेडसाठीही त्यांनी निधी दिला असता. पण तुम्हाला काही फस्त करायचे म्हणून निधी हवा होता का? असा सवाल हेमंत पाटील यांनी उपस्थित केला. अशोक चव्हाण यांची महापालिकेत सत्ता आणि रामदास कदम नांदेडचे पालकमंत्री असताना गोदावरी शुद्धीकरणासाठी दिलेला 20 कोटींचा निधी त्यांच्या टोळक्याने फस्त केला.

आतापर्यंत नांदेडमध्ये आलेला निधी खाण्याचे आणि महापालिकेच्या मोक्याच्या जागा विकण्याचे काम अशोक चव्हाण आणि त्यांच्या टोळक्याने केले आहे. शहरासाठी कोट्यावधीचा निधी येऊन देखील बकाल अवस्था झाली आहे. 72 वर्ष शहराची आणि जिल्ह्याची सत्ता चव्हाण कुटुंबियांकडे आहे. पण अजूनही नांदेडमध्ये वेळेवर पाणी येत नाही, ड्रेनेजचे पाणी पवित्र गोदावरीमध्ये सोडले जाते. मग इतकी वर्ष तुम्ही काय केले, फक्त आलेला निधी खाल्ला आणि महापालिकेच्या जागा विकून पैसा कमावला, असा आरोपही हेमंत पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT