Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिंदेंचा ठाकरेंना मराठवाड्यात 'जोर का झटका'; 'या' वजनदार नेत्यानं निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडली

ShivsenaUBT Politics : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची शहरात सभा होणार असून, त्यात समर्थकांसह ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झडू लागली आहे.

Deepak Kulkarni

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा झटका बसला आहे. विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर जिल्हाप्रमुख पदावरून हटविलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शहरात लवकरच सभा होणार असून, त्यांच्या उपस्थितीत तनवाणी शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे यांनी मराठवाड्यावर ताकदीने फोकस करत शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी जोर लावला आहे. त्यातच त्यांनी ठाकरेंना धक्क्यावर धक्के देणंही सुरुच ठेवलं आहे.

माजी आमदार किशनचंद तनवणी यांनी 2014 मध्ये शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी ते स्वगृही परतले होते. जिल्हाप्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली होती.

दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, हिंदू मतांचे विभाजन होत असल्याचे कारण देत त्यांनी माघार घेतली.त्यामुळे जिल्हाप्रमुख पदावरून तनवाणी यांना हटविण्यात आले होते. बुधवारी (ता. 6) त्यांनी ठाकरे गटाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला

आता माजी आमदार किशनचंद तनवाणी हे एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांची शहरात सभा होणार असून, त्यात तनवाणी हे समर्थकांसह प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झडू लागली आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी जाहीर केलेल्या किशनचंद तनवाणी यांनी माघारीचा निर्णय घेतला. यावर शिवसेनेकडून तातडीने निर्णय घेत शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर तनवाणी यांच्याकडे असलेले जिल्हाप्रमुख पदही काढून घेण्यात आले होते.

शिवसेनेकडून (Shivsena) किशनचंद तनवाणी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मध्य मतदारसंघातील इतर इच्छुकांनी थेट मातोश्री गाठत नाराजी व्यक्त केली होती. या नाराजांना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सर्व्हे करून निर्णय घेण्यात येईल असे, आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर किशनचंद तनवाणी यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.

तेव्हापासून शिवसेनेमध्ये अंतर्गत वादावादी सुरू असल्याची चर्चा होती. विधानसभा निवडणुकीत या अंतर्गत गटबाजी आणि नाराजीचा फटका आपल्याला बसू शकतो, याचा अंदाज तनवाणी यांना आल्यामुळे त्यांनी माघारीचा निर्णय घेत दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चाही या निमित्ताने होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT