Mumbai News : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरीवर्ग पिचला असून मदत मिळत नसल्याने त्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. राज्य सरकारकडून शेतकरी वर्गाला तातडीने जाहीर करण्यात आलेली मदत ही तुटपुंजी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी येडशी येथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतरही भरीव मदत देण्यात आली नसल्याने आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दसऱ्यापासून 'आत्मक्लेश' आंदोलन सुरु केले असून जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही तोपर्यंत पादत्राणे घालणार नसल्याचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
धाराशिव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी रुपये 50 हजाराची मदत करावी. तसेच शेतकऱ्यांची सर्व कर्जमाफी करावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली येडशी (ता. धाराशिव) चौरस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास धाराशिव जिल्ह्यात मंत्र्याच्या गाड्या आडविण्यात येतील, असा इशारा दुधगावकर यांनी दिला होता.
त्यानंतर चार दिवसापूर्वीच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, मदत जाहीर करताना राज्य सरकारने हात आखडता घेतला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकरी वर्गासाठी मोठ्या प्रमाणात मदतीची अपेक्षा आहे. त्यासोबतच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत न केल्याने धाराशिव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दसऱ्यापासून 'आत्मक्लेश' आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही तोपर्यंत पादत्राणे घालणार नसल्याचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.
2019 साली सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूर आला होता त्यावेळी राज्य सरकारने त्याठिकाणी शेतकऱ्यांना भरीव मदत केली होती. मात्र, धाराशिव जिल्ह्यात चार महिन्यात अतिवृष्टी झाली असून जवळपास 1278 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेरणा, चांदणी, मांजरा व सीना कोळेगाव धरणातून 60 हजार क्यूसेसने पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नदीच्यावर जवळपास 11 फूट इतके पुराचे पाणी होते . त्यामुळे शेतातील पिकासोबतच जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे ही जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकऱ्यांना 20 वर्षापेक्षा अधिक काळ लागू शकतो, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे.
त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. मात्र, मुला-मुलींचे लग्न जुळवताना (सोयरीक जुळवताना) या कारणांमुळे अडचणी येत असल्याने काही आत्महत्या उघड केल्या जात नाहीत. आजारपणामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे पुढे आल्यास त्या कुटुंबातील नातेसंबंध जोडण्यास कोणी तयार होत नसल्याने आत्महत्या झाकण्याचे प्रकार घडत असल्याचेही दुधगावकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.
धाराशिव जिल्ह्यामधील 100 टक्के पीक अतिवृष्टीमुळे उद्धवस्थ झाली आहेत. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन 50 हजाराची तातडीने मदत करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली व गाळ साठला आहे, अशा बहुभुधारक शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळे तलाव, बंधारे, ओढे, रस्ते, पूल वाहून गेलेले आहेत, त्याची ताबडतोब दुरुस्ती करावी, अशी मागणी दुधगावकर यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.