Maharashtra Assembly Election 2024 : लातूर भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी आज भाजपला अचानक धक्का दिला. महाविकास आघाडीचे लातूर शहर व ग्रामीणचे उमेदवार अमित आणि धीरज देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर आयोजित मेळाव्यात सुधाकर शृंगारे यांनी थेट एन्ट्री घेत सर्वांनाच धक्का दिला. व्यासपीठावर अमित देशमुख-धीरज देशमुख यांची गळा भेट घेतली. ही गळा भेटच सुधाकर शृंगारे यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाची भेट ठरली.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला झटका बसला आहे. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या लातूर (Latur) मतदार संघातून भाजप महायुतीचे उमेदवार असलेले सुधाकर शृंगारे यांचा महाविकास आघाडीचे डॉ. शिवाजी काळगे यांच्याकडून पराभव झाला. तेव्हापासून पक्षाशी अंतर राखून असलेले शृंगारे आज अचानक काँग्रेसमध्ये दाखल झाले.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रॅलीत सहभागी झालेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या व्यासपीठावरच अवतरले.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख आणि लातूर शहर- ग्रामीणचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अमित- धीरज देशमुखांनी शृंगार यांचे जोरदार स्वागत केले. अमित देशमुख यांनी तर शृंगारे यांना व्यासपीठावरच मिठी मारली. त्यानंतर धीरज देशमुख यांनी शृंगारे यांना पुष्पगुच्छ देत त्यांची गळाभेट घेतली.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुधाकर शिंगारे हे भाजपच्या कुठल्याच कार्यक्रमात फारसे दिसले नाही. 2019 मध्ये लोकसभेवर निवडून गेलेल्या शृंगारे यांच्यावर कायम त्यांचा मतदार संघाशी संपर्क नसल्याची टीका केली जायची.
महाविकास आघाडीने देखील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हाच मुद्दा प्रामुख्याने पुढे केला होता. अमित देशमुख यांनी जे पाच वर्षात कधी जिल्ह्यात आले नाही, त्यांना आता पुन्हा येऊ देऊ नका, असे आवाहन मतदारांना केले होते.
लोकसभेत याच महाविकास आघाडीने सुधाकर शृंगारे यांचा सलग दुसरा आणि भाजपचा तिसरा विजय रोखला. डाॅ. शिवाजी काळगे यांना तब्बल सहा लाख मते मिळाली होती. तर भाजपच्या शृंगारे यांना 5 लाख 47 हजार मतदरांची पसंती मिळाली होती.
61 हजारांच्या मताधिक्याने काँग्रेसने ही जागा जिंकली होती. भाजपमध्ये आता राजकीय भवितव्य उरले नाही, असे शृंगारे यांच्या समर्थकांचे मत झाले होते. लोकसभेप्रमाणेच विधानसभेला राज्यात महाविकास आघाडीला यश मिळेल, असा दावा केला जातोय.
या पार्श्वभूमीवर सुधाकर शृंगारे यांनी भाजपला राम राम करत काँग्रेसचा हात हातात घेण्याचा निर्णय घेतला. आता गढीवरचे देशमुख काँग्रेसमध्ये शृंगारे यांचे राजकीय पुनर्वसन करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
भाजपने मात्र शृंगारे यांच्या काँग्रेस प्रवेशाची फारसी दखल सध्या तरी घेतलेली दिसत नाही. काँग्रेसमध्ये प्रवेश करतांना शृंगारे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जिल्ह्यातील नेते-पदाधिकार्यांनी आपली साथ दिली नाही, काम केले नाही, असा आरोप केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.