Amit deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Loksabha Election 2024: लातूर लोकसभेचा उमेदवार ठरेना अन् अमित देशमुखांना पडली धाराशिवची चिंता

राम काळगे

Latur News: लातूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून नेमका उमेदवार कोण ? याबाबत अद्याप शिक्कामोर्तब होत नसले तरी माजी मंत्री अमित देशमुख यांना शेजारच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाची चिंता लागली असल्याचे दिसते. त्यांनी महाविकास आघाडीकडून आमचे उमेदवार ओमराजे निंबाळकर असतील असे जाहीर करून टाकले. (Loksabha Election 2024)

इकडे लातूरचा उमेदवार कोण राहणार ? हे देशमुख सांगत नाहीत, त्यांना धाराशिवची एवढी चिंता आणि घाई का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. औसा येथील एका कार्यक्रमात अमित देशमुख यांनी महायुतीचा चांगलाच समाचार घेतला. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीला अजून तरी उमेदवार सापडत नाही, आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार 'ओमराजेच' असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण लातूर लोकसभा मतदारसंघातून नेमका उमेदवार कोण? असा सवाल कार्यकर्ते करीत आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघ आरक्षित असला तरी या मतदारसंघातून राहणारा काँग्रेसचा उमेदवार स्थानिकचा का बाहेरचा ? असा खल कार्यकर्ते करत असून ही निवडणूक अतिशय महत्त्वाची राहणार आहे.

काँग्रेसकडून यावेळी लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात येत असली तरी धाराशिव मतदारसंघातील उमेदवाराबाबत निश्चितता मानली जात आहे. ओमराजे निंबाळकर हेच संभाव्य उमेदवार राहणार असल्याचे जाहीर करत महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम झाल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

मग अजून लातूर लोकसभेचा उमेदवार का ठरत नाही ? असा सवाल यानिमित्ताने कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. लातूर लोकसभा आरक्षित झाल्यापासून केवळ एकवेळा काँग्रेसचा उमेदवार जिंकला आहे. उर्वरीत दोन टर्म भाजपाने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस झाडून प्रचाराला लागून आपला उमेदवार निवडून आणणार का? हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी लातूरची काँग्रेस यावेळी कसे प्रयत्न करणार हे गटबाजीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय मार्ग काढतात यावर अवलंबून असणार आहे. कारण यापूर्वी झालेल्या निवडणुकीत जिंकण्यासाठी निवडणुका लढल्या का ? याबाबत अनेकदा कार्यकर्त्यांकडून खल झाला आहे.

शिवाय अमित देशमुख यांची येत्या निवडणुकीत महत्वपूर्ण जबाबदारी राहणार असली तरी लातूर मतदारसंघापेक्षा धाराशिव मतदारसंघातील उमेदवाराची चिंता त्यांना आधिक का वाटते ? असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे. शिवाय महायुतीला अजून तरी आमच्या विरोधात उमेदवार सापडत नाही, अशी टीका करून एकप्रकारे अमित देशमुख यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न तर केला नाही ना ? अशी कुजबुज कार्यकर्ते करत आहेत.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT