Beed News : राज्यातील विधानसभा निवडणूक रंगात आली आहे. त्याप्रमाणे प्रचार दिवसेंदिवस शिगेला पोहचत आहे, त्यातच सत्ताधारी व विरोधकाककडून एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सॊडली जात नसल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच प्रचार करीत असताना बीड जिल्ह्यातील एका ज्येष्ठ नेत्याने त्यांचे चिन्हच विसरून दुसऱ्याचे चिन्हच मतदारांना सांगितले. या प्रकारामुळे प्रचारादरम्यान झालेली ही चूक कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर माजी आमदाराची मोठी अडचण झाली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून बीड जिल्हा हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या ठिकाणचे वातावरण निवडणूक म्हटले की चांगलेच तापते. त्यामुळे येथील निवडणुकीककडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच बीड जिल्ह्यातील भाजपच्या (Bjp) एका बंडखोर उमेदवाराकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चूक झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. ही चूक कार्यकर्त्यांनी लक्षात आणून देताच त्यांची चांगलीच धांदल उडाली. माजी आमदारानी केलेली चूक जवळच्या कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी झालेल्या चुकीवर पडदा टाकत पुढे प्रचार सुरु ठेवला.
बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजपकडून सुरेश धस यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. आपल्याला संधी न मिळाल्याने माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आणि आता ते आष्टी विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी माजी मंत्री सुरेश धस यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. ते अपक्ष म्हणून लढत आहेत.
मतदारसंघात त्यांचा प्रचार सध्या सुरु आहे. यातच भीमराव धोंडे यांच्या प्रचारासाठी आष्टीमध्ये सभा आयोजित केली होती. यावेळी मात्र भीमराव धोंडेंनी मोठी चूक केली. मतदारांना आवाहन करताना ते स्वत:चेच चिन्ह विसरले. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. ही बाब कार्यकर्त्यांनी लक्षात आणून देताच त्यांची गडबड झाली. त्यानंतर झालेल्या चुकीत सुधारणा केली.
आष्टीतील त्यांच्या प्रचार सभेत अशाप्रकारचे विधान केल्याने त्या चर्चेने आता जोर धरला आहे. दरम्यान, भीमराव धोंडे यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे. आष्टी मतदारसंघात त्यांना महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांच्यासमोर धोंडेंचे आवाहन असणार आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मेहबूब शेख यांना संधी देण्यात आली आहे.
आष्टी मतदार संघात सुरेश धस, भीमराव धोंडे व महेबूब शेख यांच्यात तिरंगी लढत होत आहे. या ठिकाणी होत असलेल्या तिरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच प्रचारावेळी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केलेल्या चिन्हातील चुकीची चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे. आष्टीतील या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोंहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.