अनिल कदम
Deglur Assembly Constituency : मुखेड विधानसभेचे दोन वेळा आणि देगलूर विधानसभेचे एकदा असे तीन वेळा शिवसेनेकडून आमदार झालेले माजी आमदार सुभाष साबणे यांनी तीन वर्षापुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2021 मध्ये झालेल्या देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपाचे `कमळ` हाती घेतले होते. पण सहानुभूतीच्या लाटेवर जितेश अंतापूरकर हे मोठ्या मताधिक्याने विजय झाले होते. माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांनी जितेश अंतापूरकर यांच्यासाठी आपली शक्ती पणाला लावली होती.
परिणामी शिवसेना सोडून उमेदवारीसाठी (BJP) भाजपमध्ये गेलेल्या साबणे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन पुनर्वसन करण्याचा शब्द भाजपच्या श्रेष्ठींनी साबणे यांना दिला होता. परंतु अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही दीड महिन्याआधी काँग्रेसचे देगलूर-बिलोलीचे आमदार जितेश अंतापूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
विद्यमान आमदार असल्याने आणि अशोक चव्हाण यांनीच त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने उमेदवारी त्यांच्याच गळ्यात पडणार? हे निश्चित समजले जाते. अशावेळी पक्षात राहून आणखी प्रतिक्षा करण्यापेक्षा नवा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय सुभाष साबणे यांनी घेतला. साबणे यांनी तिकिट देण्याच्या आश्वासनाची वरिष्ठांकडून पूर्तता न झाल्याने व्यथित होऊन अखेर भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह प्रदेश कार्यकारणी सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
आज (ता.19) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी `वैयक्तिक कारणास्तव` असा उल्लेख केला असला तरी नाराजी हेच त्यांच्या राजीनाम्याचे कारण असल्याचे लपून राहिलेली नाही. (Jitesh Antapurkar) शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या साबणेंचा भाजपातील प्रवास अवघ्या तीन वर्षातच संपला. साबणे यांना शिवसेनेने अनेक मोठ्या पदाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. राज्य विधिमंडळाच्या तालीका सभापतीपदाचा ही बहुमान त्यांना देण्यात आला होता.
जिल्ह्यातील एकाधिकारशाही मुळे माझी कशी कुचुंबना होत होती हे कारण सांगत साबणे यांनी 2021 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. देगलूर-बिलोली पोट निवडणुकीत साबणे फारशी चमक दाखवू शकले नव्हते. पुर्वी जेवढी मते त्यांना मिळत होती, तेवढीच पोटनिवडणुकीतही मिळाली. मतांमध्ये वाढ न करू शकलेल्या साबणे यांना तेव्हापासूनच भाजपचे नेते पर्याय शोधत असल्याचे बोलले जाते. देगलूर राखीव मतदार संघ महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. माजी आमदार साबणे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठाशी संपर्क साधल्याचे बोलले जाते.
परंतु महिन्यापूर्वी भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झाले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी नायगाव व देगलूर या मतदारसंघातला उमेदवार माझ्या पसंतीनेच देण्यात यावा, अशी अट घातली होती, अशी चर्चा आहे. तेव्हा या दोन मतदारसंघात खतगावकर सांगतिल तोच उमेदवार दिला जाईल हे स्पष्ट आहे. अशावेळी साबणे अपक्ष किंवा तिसऱ्या आघाडीचा पर्याय स्वीकारतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईत मुखेड चे माजी आमदार अविनाश घाटे यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. अशोक चव्हाण यांनी अंतापूरकर यांना भाजपमध्ये घेऊन महाविकास आघाडीसमोर आव्हान उभे केले आहे, त्यालाच प्रत्युत्तर म्हणून भास्करराव पाटील खतगावकर यांनी घाटे यांचा पर्याय दिल्याची चर्चा आहे. अद्याप महायुती-महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नाही.
सुभाष साबणे हे आता तिसऱ्या आघाडीच्या संपर्कात असून त्यांच्याकडून ते निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय अपक्ष लढून आपली ताकद दाखवून देण्याचा अंतिम पर्याय साबणे निवडू शकतात? साबणे हे रिंगणात उतरलेच तर कधीकाळी देगलूर मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले दिवंगत माजी आमदार रावसाहेब अंतापुरकर, मधुकरराव घाटे, पिराजीराव साबणे या तिन माजी आमदारांच्या सुपुत्रात व ते ही माजी आमदार राहिलेले या `तीन` वारसदारातच देगलूर- बिलोलीची निवडणूक होईल एवढे मात्र निश्चित.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.